सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरली १२ फुटी अजस्र मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:46+5:302021-07-29T04:26:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापूर ओसरल्यानंतर अनेक नागरी वस्त्यांमध्ये साप, मगरींचे दर्शन होत आहे. बुधवारी सांगलीवाडी येथे नागरी ...

In Sangliwadi, 12 feet tall crocodile entered the urban area | सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरली १२ फुटी अजस्र मगर

सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरली १२ फुटी अजस्र मगर

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापूर ओसरल्यानंतर अनेक नागरी वस्त्यांमध्ये साप, मगरींचे दर्शन होत आहे. बुधवारी सांगलीवाडी येथे नागरी वस्तीत तब्ब्ल १२ फुटी मगर आढळल्याने नागरिकांचा थरकाप उडाला. येथील युवकांच्या मदतीने वन विभागाने ही मगर पकडली व नैसर्गिक अधिवासात सोडली.

यंदा महापुरात सांगलीवाडीचा मोठा भाग पाण्याखाली गेला होता. पूर्वेकडून कृष्णा, तर पश्चिमेकडून वारणेच्या पुराचे पाणी सांगलीवाडीत आले होते. कृष्णा नदीत गेल्या काही महिन्यांमध्ये मगरींची संख्या वाढत आहे. महापुरामुळे नदीपात्रातून यातील काही मगरी नागरी वस्त्यांमध्ये आल्या. आता पूर ओसरताच त्यांचे दर्शन घडत आहे. सांगलीवाडीतही बुधवारी अजस्र मगरीचे दर्शन लोकांना झाले.

सांगलीवाडीत सकाळी ११च्या सुमारास धरण रोडवरील वीर मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही मगर प्रथम दिसली. त्यांनी नागरी वस्तीत जात असलेल्या या मगरीला लिंगायत स्मशानभूमीकडे हुसकावून लावले व तत्काळ याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी आणि सांगलीवाडी येथील नागरिकांनी बराच वेळ मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. अखेर तिला पकडण्यात यश आले. मगर पाहण्यासाठी सांगलीवाडी परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

यापूर्वीही अनेकदा सांगलीच्या नदीपात्रात व नदीकाठच्या शेतीत अजस्र मगरींचा वावर दिसून आला होता. महापुराच्या काळात आता पाणी ओसरल्यानंतर मगरी व साप दिसत आहेत. सांगलीवाडीच्या लिंगायत स्मशानभूमी परिसरात मगर आढळल्यानंतर नागरिकांचा थरकाप उडाला होता. पूरग्रस्तांना घराची स्वच्छता करतानाही भीती वाटत आहे.

चौकट

मौजे डिग्रजमध्येही सापडली मगर

डिग्रज येथे मंगळवारी (दि. २७) एका घराच्या छतावर अडकून पडलेली मगर आढळली होती. सांगलीवाडीत मगरीची तीन पिल्लेही आढळली. या मगरींना पुन्हा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मगरींचा नागरी वस्त्यातील वावर चिंता वाढविणारा ठरत आहे.

Web Title: In Sangliwadi, 12 feet tall crocodile entered the urban area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.