राष्ट्रवादी सहकार सेलवर सांगलीच्या दोघांची वर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:25 IST2021-02-07T04:25:34+5:302021-02-07T04:25:34+5:30
विटा : मुंबई शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार सेलवर सांगली जिल्ह्यातील दोघांची वर्णी लागली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ...

राष्ट्रवादी सहकार सेलवर सांगलीच्या दोघांची वर्णी
विटा : मुंबई शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार सेलवर सांगली जिल्ह्यातील दोघांची वर्णी लागली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार सेलच्या उपाध्यक्षपदी उत्तमराव भाऊसाहेब माने (बांबवडे, ता. पलूस) यांची, तर चिटणीसपदी श्रीरंग बजरंग घाडगे (रायगाव, ता. कडेगाव) यांची निवड करण्यात आली आहे. या नूतन पदाधिकाऱ्यांना अल्पसंख्यांक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
मुंबई येथील सहकारी बँका, पतसंस्था, मच्छीमार, ग्राहक, मजूर, गृहनिर्माण तसेच अन्य सर्वच सहकारी संस्थांना पक्षाचे पाठबळ देऊन संस्थांची वाढ करण्याच्या उद्देशाने मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सहकारी सेलची स्थापना केली आहे. या सहकारी सेलच्या अध्यक्षपदी नंदकुमार काटकर यांची, तर उपाध्यक्षपदी उत्तमराव माने व चंद्रकांत खोपडे तसेच चिटणीसपदी श्रीरंग घाडगे यांची निवड करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांना मंत्री मलिक यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मंत्री मलिक यांनी सहकार विभाग ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनात सहकार आणि सहकारी संस्थांना नेहमीच महत्त्व दिले. राज्याच्या अर्थकारणात सहकाराचे महत्त्व जाणून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्य सहकार सेलची स्थापना केली असून, नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष व संस्थांच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष भारव्दाज पगारे, वसंतराव शिंदे, नंदकुमार काटकर, चंद्रकांत खोपडे, उत्तमराव माने, श्रीरंग घाडगे, संजय तटकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - ०६०२२०२१-विटा-मुंबई एनसीपी
ओळ : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस सहकार सेलच्या उपाध्यक्षपदी उत्तमराव माने यांची निवड झाल्यानंतर त्यांना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी डावीकडून चंद्रकांत खोपडे, वसंतराव शिंदे, नंदकुमार काटकर, भारव्दाज पगारे, संजय तटकरे उपस्थित होते.