सांगलीत ‘स्पीड गन’ला लागलाय ब्रेक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:35+5:302021-02-05T07:30:35+5:30
सांगली : बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडे असलेल्या स्पीड गनचा वापर थांबलेला आहे. पोलीस दलाकडे दोन अत्याधुनिक ...

सांगलीत ‘स्पीड गन’ला लागलाय ब्रेक!
सांगली : बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडे असलेल्या स्पीड गनचा वापर थांबलेला आहे. पोलीस दलाकडे दोन अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून देत त्याद्वारे सुरुवातीला होत असलेला स्पीड गनचा वापर थांबल्याने, वेगमर्यादा मोडून वाहनधारक सुसाट जात आहेत.
जिल्हा पोलीस दलाने सांगली व मिरज वाहतूक शाखेस दोन अत्याधुनिक वाहने गेल्यावर्षी दिली. यात इतर सुविधांसह स्पीड गनचीही सुविधा देण्यात आली होती. सुरुवातीला नित्यनियमाने याचा वापर होत होता. मात्र, आता सांगली शहरात स्पीड गनचा वापर थांबला आहे. लॉकडाऊनच्या अगोदरच बंद झालेला स्पीड गनचा वापर अजूनही होत नाही. जरी वापर होत असला तरी पूर्ण क्षमतेने त्याचा वापर होताना दिसत नाही.
शहरातील सांगली-मिरज, माधवनगर रोड, कोल्हापूर रोडवर वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी स्पीड गनने पुन्हा स्पीड घेण्याची आवश्यकता आहे.
चौकट
काय आहे स्पीड गन?
वाहतूक शाखेच्या नियाेजनानुसार शहरात ठिकठिकाणी त्या रस्त्यावरील वेगमर्यादेचे फलक लावले आहेत. त्या वेगानेच वाहन जाणे अपेक्षित असते. मात्र, अनेकजण अतिवेगाने वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देतात. त्यामुळे त्या रस्त्यावर असलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे वाहन ‘स्पीड गन’च्या टप्प्यात आले की त्याचा क्रमांक व फोटो घेतला जातो व त्या ई चलनाद्वारे दंड केला जातो.
कोट
शहरात स्पीड गनचा वापर सुरू आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. आता पुन्हा एकदा शहरातील प्रमुख मार्गावर स्पीड गनचा वापर करून वेगाने वाहन चालविणाऱ्यांना दंड केला जाणार आहे. वाहनधारकांनीही वेगमर्यादा ओलांडू नये व प्रशासनास सहकार्य करावे.
- प्रज्ञा देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा