सांगलीचे महापौरपद खुले
By Admin | Updated: August 17, 2014 00:44 IST2014-08-17T00:39:53+5:302014-08-17T00:44:45+5:30
इच्छुकांची गर्दी : पक्षातील नेत्यांची डोकेदुखी वाढणार

सांगलीचे महापौरपद खुले
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे पुढील अडीच वर्षांसाठीचे महापौरपद खुले झाले आहे. सध्या महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. खुल्या गटातून महापालिकेत इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने आगामी काळात सत्ताधारी नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबईत आज, शनिवारी राज्यातील २६ महापालिकांच्या आगामी काळातील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील फेब्रुवारी २०१६ ते आॅगस्ट २०१८ या शेवटच्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे पद खुले झाले आहे. सांगली महापालिकेची निवडणूक गतवर्षी जुलै महिन्यात झाली होती. आॅगस्टला नवे सदस्य मंडळ अस्तित्वात आले. आता आॅगस्ट २०१८ पर्यंत या मंडळाची मुदत आहे. सध्या अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी हे पद आरक्षित आहे. सध्या सांगलीतील कांचन कांबळे या महापौर आहेत. सुरुवातीच्या सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी सांगलीला हे पद देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर या पदावर मिरजेतील एखाद्या सदस्याला संधी देण्यात येईल. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अडीच वर्षांच्या कालावधीतही सांगली, मिरजेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी पहिल्या टप्प्यात सांगलीतील सदस्यांमधून दावेदारी केली जात आहे. तरीही या विषयावरून सांगली-मिरज वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगलीतून हारुण शिकलगार, मिरजेतून सुरेश आवटी, किशोर जामदार यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. शिकलगार व आवटी यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. अडीच वर्षांतील पहिल्या टप्प्यासाठी दोघांमध्ये चढाओढीची चिन्हे आहेत. नवख्या सदस्यांनीही इच्छुक म्हणून हालचाली सुरू केल्या असल्या, तरी अनुभवी सदस्यांनाच या पदावर संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. (प्रतिनिधी)