सांगलीचे मुख्य रस्तेच बनले मृत्यूचे सापळे

By Admin | Updated: June 13, 2015 00:18 IST2015-06-12T23:39:51+5:302015-06-13T00:18:47+5:30

महापालिकेचे दुर्लक्ष : आठ दिवसात १८ जखमी, पाणी, ड्रेनेजचे खड्डे खुलेच, वाहनधारकांची कसरत

Sangli's main road became the trap of death | सांगलीचे मुख्य रस्तेच बनले मृत्यूचे सापळे

सांगलीचे मुख्य रस्तेच बनले मृत्यूचे सापळे

अंजर अथणीकर - सांगली -पावसाने शहराची दैना उडाली असतानाच, शहरातील मुख्य रस्ते आता मृत्यूचे सापळे बनले आहेत. पाणी, गटारी व ड्रेनेजचे खड्डे महिनोन् महिने खुलेच राहिले असून, यामध्ये पडून गेल्या आठ दिवसात अठरा जण जखमी झाले आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी अर्ध्यावरच काम सोडल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे. नागरिकांच्या निवेदनाकडे मात्र महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

शहरातील राजवाडा चौकानजीक कामगार विमा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावरील गटारीवरील सुमारे चार फूट रुंद, दोन फूट लांब व सुमारे तीन फूट खोलीचा खड्डा गेल्या वर्षभरापासून खुला आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी या रस्त्यावर पाणी साचून राहते. दुचाकीस्वार, चालत जाणारे असे गेल्या आठ दिवसात याठिकाणी चौघेजण जखमी झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असणारा हा खड्डा अक्षरश: मृत्यूचा सापळाच बनला आहे. महापालिका आयुक्त, महापौर, जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश अशा महत्त्वाच्या व्यक्ती याच रस्त्यावरुन दिवसातून चार ते पाच वेळा येत-जात असताना, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
सिटी पोस्टासमोर व बीएसएनएल कार्यालयासमोरही ड्रेनेजचे खुले खड्डे आहेत. हे खड्डेही वर्षापासूनच उघडेच आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांनी या खड्ड्याभोवती ‘काम सुरू’ असा फलक लावला आहे. जेव्हा पोलिसांचा इतरत्र बंदोबस्त असतो, तेव्हा ते हा फलक काढून नेतात. या खड्ड्यामध्येही अनेकजण पडून जखमी झाले आहेत. सिटी पोस्टासमोरील बीएसएनएल कार्यालयासमोर फूटभर उंचीची सुमारे वीस फुटाची गटार मुख्य रस्त्यातूनच गेली आहे. ही गटारही खुलीच आहे. रात्रीच्यावेळी अनेक मोटारी यामध्ये अडकून पडल्या आहेत.
शंभर फुटीवरुन शामरावनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच साई कॉलनीनजीक सुमारे चार फूट लांबी- रुंदीचा व पाच फूट उंचीचा ड्रेनेजचा खड्डा सहा महिन्यापासून खुला आहे. गेल्या आठ दिवसात याठिकाणी पाच जण पडून जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात अजूनही काही जण उपचार घेत असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.
शंभर फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती कॉलनी चौकासमोर वीस ते तीस फुटाच्या पाईप गेल्या सहा महिन्यांपासून टाकण्यात आल्या आहेत. यावर अनेकदा मोटारी आदळत आहेत. मुख्य रस्त्यावरील खुले ड्रेनेज, पाईप, खड्ड्यांमुळे नागरिकांना मात्र जीव मुठीत धरुन जावे लागत आहे.


क्रेनचा व्यवसाय जोमात
सांगलीचे अनेक रस्ते चिखलमय असतानाच, पटेल चौक, सांगली हायस्कूल रस्ता, शिवाजी मंडई, शामरावनगर, टिंबर एरिया परिसर आदी ठिकाणाबरोबरच ड्रेनेज खड्ड्यांमध्ये अनेक वाहने अडकून पडत आहेत. महापालिकेकडे क्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांकडील लहान क्रेन व व खासगी क्रेनला मागणी वाढत आहे. क्रेन चालक वाहने खड्ड्यातून काढण्यासाठी पाचशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत घेत असल्याची माहिती क्रेन चालक फारुक सौदागर यांनी दिली.

साई कॉलनीतील ड्रेनेज खड्ड्यामध्ये गेल्या आठ दिवसात चार ते पाच जण पडाले. आम्हीच या नागरिकांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. एका तरुणाचे तर सात ते आठ दातही पडले. याच्या तक्रारीही आम्ही संबंधित विभागाकडे केल्या, मात्र हा धोकादायक खड्डा तसाच आहे. पावसात हा खड्डा पाण्याने बुजून जाऊन याचा अंदाज न आल्यामुळे अपघात होत आहेत.
- जब्बार पखाली, नागरिक, शंभरफुटी रस्ता,

Web Title: Sangli's main road became the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.