सांगलीत मद्यधुंद पोलीस निलंबित--तळीरामांची नव्या वर्षाची सकाळ कोठडीत उजाडली...
By Admin | Updated: January 2, 2015 00:11 IST2015-01-01T23:12:14+5:302015-01-02T00:11:04+5:30
आॅन ड्युटी नशा : पोलीस प्रमुखांचा दणका; दररोज हजेरीचे आदेश

सांगलीत मद्यधुंद पोलीस निलंबित--तळीरामांची नव्या वर्षाची सकाळ कोठडीत उजाडली...
सांगली : दारूच्या नशेत गणवेशात ड्युटीवर हजर राहणारा विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उदय विठ्ठल लवटे यांना जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज, गुरुवारी निलंबित केले. काल (बुधवार) रात्री कॉलेज कॉर्नरवर लवटे मद्यधुंद अवस्थेत खुद्द पोलीस प्रमुखांनाच सापडले होते.
‘थर्टी फर्स्ट’मुळे पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती. नशेत वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. याचा आढावा घेण्यासाठी सावंत शहरात फिरत होते. ते कॉलेज कॉर्नरवर गेले होते. त्यावेळी तेथे लवटे मद्यधुंद अवस्थेत त्यांना आढळून आले. त्यांची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सावंत यांनी त्यांना निलंबित केल्याचा आदेश बजावला. लवटे यांना मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांसमोर दररोज हजेरी लावण्याचा आदेश सावंत यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
तळीरामांची नव्या वर्षाची सकाळ कोठडीत उजाडली...
जिल्ह्यात बुधवारी रात्री झालेल्या नाकाबंदीत १५ तळीराम सापडले. यामध्ये दिलीप तानाजी पाटील (वय ३५, रा. देशिंग), संतोष दादासाहेब माने (२८, अलकूड, ता. कवठेमहांकाळ), महादेव बापू शेजाळ (३०, मिरवाड, ता. जत), राजू अण्णाप्पा वडर (४५), मोहन तुळशीराम शिंदे (३७), तोफीक हसन बागवान (२१), आकाश विजय पळसे (१८), शिवलिंग लिंगराज नवलाई (२४, सर्व रा. सांगली), राकेश मेघराज कांबळे (२६, कवठेमहांकाळ), सखाराम शामराव कोकरे (२५), चंद्रकांत धनपाल पाटील (५२, दोघे रा. कुपवाड), रवी शिरगुंडा चौगुले (२५, कागवाड), आप्पासाहेब रामचंद्र दोड्डमणी (२५) व ईश्वर सुखदेव शिंदे (२४, दोघे रा. मिरज), मिलिंद धोंडिराम चौगुले (१९, विश्रामबाग) यांचा समावेश आहे. यातील काहींनी जागेवरच दंड भरला, तर काही तळीरामांकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांची संपूर्ण रात्र पोलीस कोठडीत गेली.