सांगलीचे मधुमेह मुक्ती अभियान राज्यासाठी प्रेरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:30 IST2021-08-19T04:30:11+5:302021-08-19T04:30:11+5:30
ओळ : सांगलीत डायबिटीस रिव्हर्सल सेंटरतर्फे आयोजित चर्चासत्रात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सतीश परांजपे उपस्थित ...

सांगलीचे मधुमेह मुक्ती अभियान राज्यासाठी प्रेरक
ओळ : सांगलीत डायबिटीस रिव्हर्सल सेंटरतर्फे आयोजित चर्चासत्रात डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. सतीश परांजपे उपस्थित हाेते.
सांगली : मधुमेह म्हणजे कोणताही गंभीर आजार किंवा व्याधी नाही. त्यामुळे घाबरून न जाता योग्य दिशेने प्रयत्न केल्यास तो आटोक्यात येऊ शकतो. सांगलीत सुरू असलेले मधुमेह मुक्ती अभियान हे राज्यासाठी प्रेरक आहे, असे प्रतिपादन मधुमेह मुक्ती अभियानाचे प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.
लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित डायबिटीस रिव्हर्सल सेंटरतर्फे आयोजित डॉक्टरांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. डॉ. सतीश परांजपे अध्यक्षस्थानी होते. डॉ. दीक्षित म्हणाले, वैद्यकीय नियमानुसार कोणत्याही मधुमेह रुग्णाचे परीक्षण तीन महिन्यांनंतर होते. मधुमेह झाल्याक्षणीच औषधे सुरू करणे रुग्णांसाठी घातक आहे. देशभरात सध्या सुमारे आठ कोटी लोकांना टाईप २ चा मधुमेह झाल्याची आकडेवारी आहे. मात्र, त्या प्रमाणात तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. अभ्यास व संशोधनाअंती काही ठोकताळे निर्माण केले आहेत. त्याचे तंतोतंत पालन केल्यास रुग्ण व्याधीमुक्त होऊ शकतो. डॉक्टरांनी कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना धीर देऊन त्यांना विनामूल्य मार्गदर्शन करून मनातील भीती कमी करण्याची गरज आहे. यावेळी आयुर्वेदिक डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. विवेक वैद्य, जनरल प्रॅक्टिशनर्स फोरमचे डॉ. अरुण कोळी, होमिओपॅथी असोसिएशनचे डॉ. अभय देसाई, डॉ. मिलिंद किल्लेदार, डॉ. देवपाल बरगाले, नीता केळकर, संजय भिडे, शार्दुली तेरवाडकर, मेघना भिडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्रद्धा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्य प्रेमी ग्रुपचे प्रमुख श्रीरंग केळकर यांनी आभार मानले.
चाैकट
विनामूल्य सेवेचा लाखो लोकांना फायदा
राज्यात तेरा ठिकाणी डायबिटीस रिव्हर्स सेंटर विनामूल्य सुरू आहेत. अनेकदा तज्ज्ञ डॉक्टर, जनरल प्रॅक्टिशनर या केंद्रावर विनामूल्य सेवा देतात. या मोहिमेचा लाखो लोकांना फायदा होत आहे. केंद्रामार्फत विनामूल्य मार्गदर्शन केले जाते. सांगलीतील हे सेंटर राज्यासाठी प्रेरक असून मधुमेह, लठ्ठपणा यासह इतर शारीरिक शत्रूंवर मात करण्यासाठी सज्ज आहे.