रस्ते खोदून सांगलीची धर्मशाळा केली
By Admin | Updated: May 31, 2014 00:41 IST2014-05-31T00:41:30+5:302014-05-31T00:41:44+5:30
संजय पाटील : महापालिका अधिकार्यांची आढावा बैठक; पाणी पुरवठा सुरळीत करा

रस्ते खोदून सांगलीची धर्मशाळा केली
सांगली : खासदारपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेत आलेल्या संजय पाटील यांनी सांगलीतील रस्ते खुदाई व पाणीपुरवठ्याबद्दल नाराजी व्यक्त केली. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता रस्ते खुदाई करून सांगलीची धर्मशाळा केल्याचा संतप्त सवाल त्यांनी अधिकार्यांना केला. विशेषत: उपनगरांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांच्या आढावा बैठकीत केल्या. यावेळी आयुक्त अजिज कारचे यांनी महापालिकेच्या केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन खा. पाटील यांना केले. संजय पाटील यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी महापालिकेला भेट देऊन विविध योजना व समस्यांबाबत अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. रिलायन्स कंपनी व ड्रेनेजसाठी विनानियोजन रस्त्यांची खुदाई करण्यात आली असून, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. टप्प्या-टप्प्याने खुदाई करून ते बुजवून पुढील खुदाई करणे आवश्यक होते. नियोजन न करता संपूर्ण शहरभर खुदाई करण्यात आली आहे. यामुळे अपघात वाढले असून, नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. उपनगरात तर पाणीपुरवठा होत नाही. याबद्दल तुमचे नियोजन काय आहे, असा सवाल खा. पाटील यांनी केला. यावेळी आयुक्त कारचे म्हणाले की, रिलायन्स कंपनीकडून खुदाईनंतर रस्ता दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याची निविदा काढता येऊ शकली नाही. याबाबत जिल्हाधिकार्यांकडून परवानगी मिळाली नाही. आता याची निविदा काढली असून, रस्ते दुरुस्ती तात्काळ सुरू करण्यात येईल. आता कंपनीला खुदाई करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांनी, पाणी टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, लवकरच उपनगरांतही पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी ग्वाही दिली. यावेळी आयुक्त कारचे यांनी काळ्या खणीचे सुशोभिकरण, मच्छीमार्केट, रस्ते विकास प्रकल्प, झोपडपट्यांचे पुनर्वसन आदी केंद्र शासनाकडे प्रलंबित असणार्या प्रकल्पांची माहिती दिली. यासाठी खा. पाटील यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली. यावेळी शहरातील पार्किंगचा प्रश्न आदी विषयांवरही चर्चा झाली. यावेळी महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक, किशोर जामदार, सौ. नीता केळकर, सुरेश आवटी, स्वरदा केळकर, युवराज बावडेकर, जगन्नाथ ठोकळे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)