पाणीपट्टी भरूनही बाहेरून विकत घ्यावे लागतेय सांगलीकरांना पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST2021-09-26T04:28:51+5:302021-09-26T04:28:51+5:30
सांगली : नळाद्वारे होणाारा पाणीपुरवठा आरोग्याच्या नव्या समस्या निर्माण करणारा ठरत असल्याने नागरिकांनी आता सतर्कता म्हणून बाहेरून पाणी विकत ...

पाणीपट्टी भरूनही बाहेरून विकत घ्यावे लागतेय सांगलीकरांना पाणी
सांगली : नळाद्वारे होणाारा पाणीपुरवठा आरोग्याच्या नव्या समस्या निर्माण करणारा ठरत असल्याने नागरिकांनी आता सतर्कता म्हणून बाहेरून पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. पाण्यासाठी नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
सांगली शहर व परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सतत गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या सतावत आहे. गावठाणापासून उपनगरांपर्यंत सर्वत्र नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. मातीचा थरच्या थर पाण्यात दिसत आहे. अशा स्थितीत पाण्यापासून आजाराला निमंत्रण मिळत आहे. सध्या आरोग्याबाबत नागरिक अधिक सतर्क आहेत. कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा भाग म्हणून बाहेरील व्यावसायिकांकडून आरओचे पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे पाणीपट्टी भरत असताना दुसरीकडे विकतचे पाणीही घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
चौकट
महिन्याचा खर्च ६०० रुपये
व्यावसायिकांकडून त्यांच्या दुकानातील एका कॅनचा दर १० रुपये असला तरी घरपोहोच पाण्यासाठी २० रुपये घेतले जातात. प्रत्येक घरात सरासरी एक कॅन दररोज लागतो. त्यामुळे महिन्याला अतिरिक्त ६०० रुपये खर्च पाण्यावर करावा लागत आहे.
चौकट
महापालिकेचे पाणी धुण्या-भांड्यासाठी
महापालिकेकडून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने महिलांकडून हे पाणी केवळ धुण्या-भांड्यासाठी वापरले जात आहे. महापालिकेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे दिसत आहे. घरातील पाण्याच्या टाकीत मातीचा दोन इंचांचा थर साचत आहे.
कोट/फोटो २५ मिलिंद साबळे
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गढूळ व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न सतावत आहे. सर्दी, खोकला, अतिसार, घशाचे आजार वाढल्याने बाहेरून विकत पाणी घ्यावे लागत आहे.
- मिलिंद साबळे, नागरिक, संजयनगर
कोट/फोटो २५ संजय चव्हाण
गावभाग परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून गढूळ, अस्वच्छ व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आम्ही या परिसरातील सर्व नागरिक वॉटर एटीएमवरून विकत पाणी आणून वापरत आहोत. महापालिकेचे पाणी केवळ धुण्या-भांड्यासाठी वापरले जाते.
- संजय चव्हाण, नागरिक, गावभाग