कोरोनाच्या महामारीत सांगलीकरांचा अन्नयज्ञ अखंड सुुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST2021-05-18T04:27:28+5:302021-05-18T04:27:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : डोक्यात कोरोना रुग्णाविषयी चिंतेचा भडका आणि पोटात भुकेची आग अशा संकटात सापडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या ...

कोरोनाच्या महामारीत सांगलीकरांचा अन्नयज्ञ अखंड सुुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : डोक्यात कोरोना रुग्णाविषयी चिंतेचा भडका आणि पोटात भुकेची आग अशा संकटात सापडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीला सांगली-मिरजेतील अनेक संस्था व कार्यकर्ते धावले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची भूक भागविण्यासाठी रात्रंदिवस धावपळ सुरू आहे.
कोरोनाकाळात रात्रं-दिवस रुग्णालयाबाहेर थांबलेल्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. विशेषत: सांगली-मिरजेच्या बाहेरुन आलेल्या लोकांना हा प्रश्न भेडसावत आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल्स, खानावळी, खाद्यपदार्थांचे गाडे बंद आहेत. साधा बिस्कीट पुडा किंवा चहादेखील मिळणे मुश्किल आहे. त्यांची भूक भागविण्यासाठी अनेक संस्था, संघटना तसेच व्यक्तिगत स्तरावर दाते पुढे आले आहेत.
सांगलीत माहेश्वरी युवा मंचतर्फे कोविड रुग्णालयांत सकाळ-संध्याकाळ जेवणाचा डबा दिला जात आहे. मिरजेत नगरसेवक निरंजन आवटी यांनी पुढाकार घेतला असून, दोनवेळचे जेवण दिले जात आहे. मिरजेतील रहमतुल्लाह, प्रियदर्शिनी या हॉटेल्सनीही भुकेलेल्यांची भूक भागविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिजाऊ ट्रस्टने पहिल्या लाटेत सलग ५२ दिवस गरजूंची भूक भागविली. सध्याच्या दुसऱ्या लाटेत लक्ष्मी मार्केट परिसरात शिवभोजन केंद्रच सुुरू केले आहे. सांगलीत रॉयल्स युथ मावळा फाऊंडेशननेही डबे पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बेडगमध्ये सुजित लकडे मित्र परिवारातर्फे जेवण दिले जात आहे.
चौकट
रस्त्यावरील पोलिसांचेही भान
कोरोनायोद्धे म्हणून रस्त्यांवर थांबलेल्या पोलिसांची काळजी कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यांना चहा-नाष्टा, आरोग्यदायी पेये दिली जात आहेत. मिरजेत ओंकार शुक्ल यांनी सलग शंभर दिवस पोलिसांना काढायुक्त चहा देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे. दुसऱ्यांकडे धुणीभांडी करणाऱ्या सांगलीतील लता शिंदे यांनी शहरातील पोलिसांसह कोविड योद्ध्यांना सायकलवर फिरून नाष्ट्याचे पदार्थ देण्याचा उपक्रम राबवला आहे.
चौकट
बंगाली मजुरांच्या पोटाला घास
पश्चिम बंगालहून सिंधुदुर्गला निघालेले दहा मजूर रात्री सांगलीत अडकले होते. कार्यकर्ते नालसाब मुल्ला व त्यांच्या मित्रांना याची माहिती मिळताच रात्री दहा वाजता अंकली फाट्यावर मजुरांसाठी जेवणाची व्यवस्था केली. जयंत थाळीच्या माध्यमातून त्यांना श्रीखंड-चपातीचे पोटभर जेवण दिले.