सांगलीत अज्ञातांनी इंग्लंडच्या बनावट नोटा जाळल्या
By Admin | Updated: July 27, 2015 00:31 IST2015-07-26T23:17:03+5:302015-07-27T00:31:04+5:30
शेकडो नोटा : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या, अर्धवट जळालेल्या नोटा सांगली पोलिसांकडून जप्त

सांगलीत अज्ञातांनी इंग्लंडच्या बनावट नोटा जाळल्या
सांगली : येथील कत्तलखाना परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर इंग्लंडच्या बनावट नोटा जाळल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. पन्नास पौंडच्या या शेकडो नोटा होत्या. अर्धवट जळलेल्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर इंग्लंडच्या नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत परिसरातील नागरिकांना आढळून आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी आवटी यांनी भेट देऊन पाहणी केली व या नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांवर इंग्लंडच्या राणीचे चित्र आहे. त्या बनावट असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून देऊन जाळण्यामागे काय कारण असावे, याचा शोध घेतला जात असल्याचे निरीक्षक आवटी यांनी सांगितले. पन्नास पौंडच्या एकाच क्रमांकाच्या शेकडो नोटा आहेत. या नोटा कोणी तरी करण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. विदेशी चलन तयार करण्याचा हा प्रकार असावा, अशी चर्चा आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे. (प्रतिनिधी)
तपासणीसाठी नोटा नाशिककडे
प्राथमिक तपासणीत या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु तरीही त्या तपासणीसाठी नाशिकला नोटांच्या छापखान्यात पाठविल्या जाणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.