सांगलीत चुरशीने ५९ टक्के मतदान

By Admin | Updated: October 16, 2014 00:08 IST2014-10-16T00:03:34+5:302014-10-16T00:08:38+5:30

मतदान केंद्राच्या आवारात बेशिस्त वर्तन करण्याचे धाडस कोणीही केले नाही.

Sangliit Churshi polled 59 percent of the votes | सांगलीत चुरशीने ५९ टक्के मतदान

सांगलीत चुरशीने ५९ टक्के मतदान

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरस असली तरी, मतदानाची टक्केवारी मात्र वाढू शकली नाही. आज सांगली विधानसभेसाठी ५९ टक्के मतदान झाले. सकाळी अकरापर्यंत मतदारांमध्ये उत्साह होता, त्यानंतर अनेक ठिकाणची मतदान केंद्रे ओस पडली होती. किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत झाले. शहरात मात्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टिंबर एरियातील संजय गांधी झोपडपट्टीमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दुपारी चारनंतर त्यांनी माघार घेतली. आजच्या मतदानाने विधानसभेच्या रिंंगणात असलेल्या १९ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. आता मतमोजणी १९ आॅक्टोबरला होणार आहे. 1मतदानासाठी सुट्टी जाहीर केली होती. यामुळे शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांनी या सुट्टीचा आनंद घेतला. सुट्टीमुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. केवळ मतदान केंद्राजवळच मतदारांची गर्दी दिसत होती. मतदान केंद्र परिसरातील दुकानेही बंद होती. सायंकाळी सातनंतर दुकाने सुरु झाल्यानंतर रस्त्यावर गर्दीही दिसत होती. 2मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर शस्त्रधारी पोलिसांचा कडा पहारा होता. फिरती गस्त पथकेही तैनात केली होती. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत हे प्रत्येक मतदान केंद्रातील सुरक्षेचा आढावा घेत होते. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. 3मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज पवार यांच्या समर्थकांनी मारुती चौकात फटाक्यांची आतषबाजी केली, तर काँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांच्या समर्थकांनी खणभागमध्ये फटाक्यांच्या माळा लावल्या. मदन पाटील यांनी मतदानानंतर शहरात फेरफटका मारुन मतदानाचा आढावा घेतला. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना माहिती देत होते. बहुतांश उमेदवारांनी आपआपल्या परीने अंदाज घेतला. जोर कुणाचा हाय रं..... मतदान करुन आल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये जोर कुणाचा हाय रं...अशी चर्चा रंगली होती. एकमेकांशी मोबाईलवर संपर्क साधून आतापर्यंत किती टक्के मतदान झाले, कोण आघाडीवर आहे, अशी विचारणा केली जात होती. त्यानंतर ते एकमेकांत हा निवडून येईल, कोण मागे पडेल, असे निष्कर्ष काढत होते. सांगलीत रात्री उशिरापर्यंत कोण कोठे ‘लिड’ घेणार, याची चर्चा रंगली होती. सायंकाळनंतर मात्र बंदोबस्त कमी झाला होता. मिरज ग्रामीणमध्ये मताचा टक्का वाढला मिरज मतदारसंघात पूर्व भागातील गावांचा समावेश आहे. मिरज ग्रामीणमध्ये मताचा टक्का चांगलाच वाढला होता. गावागावात चुरशीने मतदान होत होते. सकाळी मतदार केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर दुपारी काही केंद्रे ओस पडली होती. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मात्र मतदानाचा टक्का घसरला. शहरी मतदारांत मतदानाबाबत फारशी उत्सुकता दिसून येत नव्हती. उमेदवारांनी मतदारांसाठी वाहनांची व्यवस्थाही केली होती. पण बहुतांश वाहने केंद्राजवळच उभी होती. मिरजेतील विद्यामंदिर प्रशालेत महिला मतदाराबाबत गोंधळ उडाला. या महिला मतदारांकडील ओळखपत्रावरील छायाचित्र व प्रत्यक्ष मतदारयादीतील छायाचित्र यात फरक होता. त्यामुळे या महिलांचे मतदान काही काळ थांबविण्यात आले होते. शहरातील झोपडपट्ट्यामधून पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी मिरज पोलिसांत आल्या होत्या. निनावी दूरध्वनी आल्यानंतर पोलिसांनी झोपडपट्टीत तपासणी करून खातरजमा केली. पण तिथे कोणताही अनुसूचित प्रकार आढळून आला नाही. मिरज मतदारसंघात ६१ टक्के मतदान मिरज : मिरजेत शांततेत ६१.३० टक्के मतदान झाले. शहरात व ग्रामीण भागात सुरूवातीला संथ असलेल्या मतदानाला दुपारनंतर गती मिळाली. आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर मतदान केंद्रांवर रांगा होत्या. मात्र दुपारी मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. मिरजेत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतदानासाठी मतदार नेण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. उमेदवार मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांचा अंदाज घेत होते. तालुक्यातील मालगाव, आरग, बेडग, भोसे या मोठ्या गावांत मोठी चुरस होती. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.०६ टक्के, ११ वाजेपर्यंत १९ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत ३०. ८ टक्के व चार वाजेपर्यंत ४०.११ टक्के मतदान झाले. मिरजेत सुरूवातीला मतदानाचा वेग संथ होता. दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ चाळीस टक्के मतदान झाले होते. शहरात सकाळी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र दुपारी बारानंतर मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मतदारांचा निरूत्साह होता. द्राक्ष छाटण्या सुरू असल्याने ग्रामीण भागात मतदार सायंकाळी पाचनंतर मतदान केंद्रावर आले. सायंकाळी पाचनंतर अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याने गतीने मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर पाच उमेदवारांचे बुथ असल्याने बुथवरील कार्यकर्त्यांचीच गर्दी दिसत होती. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मतदारांची नावे शोधण्यासाठी मतदार याद्यांऐवजी लॅपटॉपचा वापर सुरू होता. शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदानाबाबत उत्साह दिसून येत होता. शहरात मतदानाचा टक्का कमी झाला आहे. दुपारी उन्हाच्या तडाख्यामुळे मतदान केंद्रावरील गर्दी बऱ्यापैकी ओसरली होती. सायंकाळी पुन्हा मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. शिराळ्यात दोन मतदान यंत्रे पडली बंद शिराळा येथील श्री शिवछत्रपती विद्यालय मतदान केंद्रातील अधिकारी सौ. विशाखा राजेंद्र सावंत (वय ४८, रा. शिराळा) या मतदारांना शाई लावत होत्या. त्यांना बिब्ब्याची अ‍ॅलर्जी होती. मतदारांच्या शाईमध्ये बिब्ब्याचा वापर केल्याने त्याचा त्रास सावंत यांना झाला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सांगलीला पाठविण्यात आले. शिराळा शहरात आमदार मानसिंगराव नाईक गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान वेळ संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात विजयाचा गुलाल व फटाक्यांची आतषबाजी आजच केली. तसेच माजी मंत्री शिवाजीराव नाईक गटाच्या कार्यकर्त्यांनीही फटाक्यांची आतषबाजी केली. तर देशमुख गटाने मात्र निकालाची प्रतीक्षा करण्याचा निर्धार केला आहे. निकालापूर्वीच दोन्ही नाईक गटांनी आतषबाजी केल्याने शिराळ्यास वाळवा तालुक्यातील जनतेत मोठी चर्चा रंगली आहे. मतदारांच्या स्वागतासाठी पुनवत येथे प्रवेशद्वारापासून मतदान केंद्रापर्यंत फुले पसरली होती. बेलदारवाडी, धसवाडी, गुढे आदी ठिकाणी गुलाबांची फुले देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले. आदर्श मतदान केंद्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक ठिकाणी हा उपक्रम झाला. यावेळी मंडळ अधिकारी हसन मुलाणी यांनी मतदारांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या नव्या उपक्रमाचे मतदारांतून कौतुक होत होते. 1भाटशिरगाव (ता. वाळवा) हे एकमेव संवेदनशील गाव असून, याठिकाणी चोख बंदोबस्त, व्हिडिओ कॅमेरा, तसेच पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्यासह सीमा राखीव दलाचे कर्मचारी यांनी वारंवार भेट दिली. तसेच संपूर्ण गावामधून फिरून ते परिस्थितीची पाहणी करीत होते. त्याचबरोबर निवडणूक निरीक्षक राजेंद्र प्रसाद, निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे, तहसीलदार विजय पाटील यांनीही याठिकाणी भेट दिली. निवडणूक निरीक्षक राजेंद्र प्रसाद यांनी तालुक्यातील चिखली, कोकरुड आदी ठिकाणीही पाहणी केली. 2ढाणकेवाडी (ता. शिराळा) हे डोंगरावरील गाव. या ठिकाणी मतपेट्या तसेच कर्मचाऱ्यांना पोहोचविण्यासाठी एसटी बसची सोय केली होती. या डोंगरावर जाणारा रस्ता पावसाने खराब झाल्याने गावात जाताना अनेक संकटांना तोंड देत ही बस गावात पोहोचली. त्यामुळे आज मतपेट्या परत आणताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जीपमधून मतपेट्या व कर्मचाऱ्यांना आणण्यात आले. 1 शहरातील एका मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याचा अज्ञाताने दूरध्वनी केल्याने निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व तंत्रज्ञांनी तेथे धाव घेतली. मात्र मतदान यंत्रात बिघाड नसल्याचे व मतदान सुरळीत सुरू असल्याचे निष्पन्न झाले. २८६ मतदान केंद्रांपैकी एकाही मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडले नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाणे यांनी सांगितले. 2नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात प्रचारादरम्यान उमेदवारांसोबत असलेले काही नगरसेवक मतदानादिवशी भलत्याच ठिकाणी होते. नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नमुळे उमेदवार चिंताग्रस्त होते. काही नगरसेवकांनी रात्रीत गट बदलला असल्याची चर्चा होती. काही ठिकाणी नगरसेवक एकीकडे, तर कार्यकर्ते दुसऱ्याच बूथवर, अशी परिस्थिती होती. 3निवडणूक प्रचारादरम्यान मिरजेत केवळ एकदाच हजेरी लावलेल्या खा. संजय पाटील यांनी आज मतदान संपण्यापूर्वी मिरजेत ब्राह्मणपुरीतील मतदान केंद्राला भेट दिली. जिल्ह्यातील मिरज व तासगावसह भाजपचे सर्व उमेदवार निवडून येतील. राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला. 4शहरात अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर दाढीधारी पंजाबी पोलीस बंदोबस्तास असल्याने राजकीय पक्षांचे कार्यकर्ते बिचकून होते. पोलिसांसोबत वाद घालणाऱ्या इब्राहीम चौधरी यांना अटक झाल्यामुळेही मतदान केंद्राच्या आवारात बेशिस्त वर्तन करण्याचे धाडस कोणीही केले नाही.

Web Title: Sangliit Churshi polled 59 percent of the votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.