जयंतरावांविरोधात सांगलीकरांची खेळी
By Admin | Updated: August 19, 2014 23:38 IST2014-08-19T23:33:33+5:302014-08-19T23:38:33+5:30
विधानसभा निवडणूक : इस्लामपुरात विरोधकांची दहीहंडी आज

जयंतरावांविरोधात सांगलीकरांची खेळी
अशोक पाटील - इस्लामपूर -ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात फिल्डिंग लावल्यानंतर आता सांगलीतील त्यांच्या विरोधकांनी त्यांना आयर्विन पूलच ओलांडू द्यायचा नाही, यासाठी इस्लामपूर मतदार संघातच त्यांना गुंतविण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. जयंतरावांचे कट्टर विरोधक नानासाहेब महाडिक यांना ताकद देण्यासाठी सांगलीकरांनी चंग बांधला आहे. या विरोधकांच्या अस्तित्वाची दहीहंडी उद्या (बुधवारी) इस्लामपुरात फुटणार आहे. महाडिक यांचे नाव जाहीर करुन जयंतरावांना धक्का देण्याचा बेत शक्तिप्रदर्शनातून होणार आहे.
काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी मोदी लाटेची धास्ती घेतली आहे. त्यातच जिल्हाभरातील जयंतरावांचे शिलेदार भाजप, शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या भूमिकेतून जयंतरावांनी राजकीय खेळीस सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांनी इस्लामपूर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. जयंतरावांच्या विरोधात नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, सदाभाऊ खोत यांच्याबाबत चाचपणी झाली आहे. महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे समजते. सर्वोदय कारखान्याच्या मालकीवरुन जयंतराव आणि भाजपचे आमदार संभाजी पवार यांच्यातील दरी रुंदावली आहे. त्यामुळे कसबे डिग्रज मंडलामध्ये महाडिक यांना ताकद देण्यासाठी आ. पवार व त्यांचे पुत्र पृथ्वीराज सरसावले आहेत. महाडिक हे वसंतदादा घराण्याचे नातेवाईक असल्याने दादा घराणेही छुप्या मार्गाने जयंतरावांविरोधात कार्यरत होण्याची शक्यता आहे. या शक्याशक्यतेने जयंतरावांनी सांगलीतील मदन पाटील आणि संभाजी पवार यांची ताकद संपविण्याचा ‘कार्यक्रम’ आखला आहे.
महाडिक युवाशक्तीच्या माध्यमातून इस्लामपुरात दरवर्षी मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. या दहीहंडीला शह देण्यासाठी जयंतराव गटाकडूनही दहीहंंडीचे आयोजन करण्यात येत होते. परंतु अलीकडील दोन वर्षात जयंत पाटील यांच्या समर्थकांच्या दहीहंडीचे स्वरुप थंडावले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांनी दहीहंडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. त्यासाठी जयंतरावांच्या विरोधातील सर्वच नेते एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप नसल्याचे सांगितले जात असले तरी, इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीला पर्यायाने जयंतराव गटाला संपविण्यासाठीच दहीहंडी फोडली जाणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात आहे.