राष्ट्रीय एकतेसाठी धावले सांगलीकर

By Admin | Updated: November 11, 2014 00:05 IST2014-11-10T22:02:30+5:302014-11-11T00:05:14+5:30

तरुणांचा सहभाग : अधिकारी, खेळाडू सहभागी; ‘रन फॉर युनिटी’ला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

Sangliikar ran for national unity | राष्ट्रीय एकतेसाठी धावले सांगलीकर

राष्ट्रीय एकतेसाठी धावले सांगलीकर

सांगली : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचा संदेश देत आज (शुक्रवार) सांगलीकर ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीमध्ये उत्साहाने धावले.जिल्हा प्रशासनाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये आज रन फॉर युनिटी अशी एकता दौड झाली. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधून रन फॉर युनिटी या एकता दौडीस प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, महापालिका आयुक्त अजिज कारचे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, डॉ. विजयकुमार शहा, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजित राऊत आदि उपस्थित होते.
या एकता दौडीच्या माध्यमातून आज सांगलीतील अबाल-वृध्द रस्त्यावर एकता आणि अखंडतेचा संदेश देत धावले. यामध्ये शालेय विद्यार्थी, तरूण-तरूणी, खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेऊन एकतेचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. रन फॉर युनिटी या एकता दौडीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांच्याहस्ते करण्यात आला. सुरुवातीला महापालिकेच्या क्रीडा अधिकारी मंगल फोंडे यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.
‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीस छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून प्रारंभ होऊन ही एकता दौड पुढे आमराई, वखारभाग, पटेल चौक, गणपती मंदिर चौक, टिळक चौक, हरभट रोड, राजवाडा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आली आणि तेथे या एकता दौडीचा समारोप जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या मनोगताने करण्यात आला.
यावेळी अजिज कारचे, डॉ. विजयकुमार शहा यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, शिक्षणाधिकारी एम. आर. यादव, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा उपनिबंधक एस. एन. जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

स्वच्छतेला महत्त्व देण्याचे आवाहन
देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी संपूर्ण समाजाने सज्ज राहण्यासाठी स्वत:ला समर्पित करुन देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्याकामी सहाय्यभूत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुशवाह यांनी केले. स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी देशस्तरावर स्वच्छ भारत मिशन सुरु असून आपल्या जिल्ह्यातही स्वच्छतेची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी वैयक्तिक, सामूहिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व द्यावे. उघड्यावर कचरा टाकणार नाही अशी शपथ घेऊन प्रत्येकाने आपले घर, परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा. राष्ट्रध्वजाचा आदर राखावा, असे आवाहनही कुशवाह यांनी यावेळी केले.

Web Title: Sangliikar ran for national unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.