सांगलीची ‘नथिंग टू से’ एकांकिका द्वितीय
By Admin | Updated: September 11, 2015 23:12 IST2015-09-11T23:12:56+5:302015-09-11T23:12:56+5:30
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा : अभिनय, पार्श्वसंगीत, दिग्दर्शन, नेपथ्यातही बाजी

सांगलीची ‘नथिंग टू से’ एकांकिका द्वितीय
सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने आयोजित लक्ष्मणराव देशपांडे स्मृती करंडक एकांकिका स्पर्धेच्या मुंबईतील माटुंगा येथे पार पडलेल्या अंतिम फेरीत सांगलीच्या नाट्य परिषदेच्या चिंतामणीनगर शाखेच्या ‘नथिंग टू से’ या एकांकिकेस द्वितीय क्रमांक मिळाला. अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य यामध्ये अनेक बक्षिसे या एकांकिकेने पटकाविली. प्रत्येक केंद्रातून दोन सर्वोत्कृष्ट एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. प्राथमिक फेरीत चार केंद्रांतून २७ शाखांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईतील माटुंगा येथे पार पडली. यामध्ये नाशिकच्या ‘कस्टमर केअर’ या एकांकिकेस प्रथम, तर सांगलीच्या चिंतामणीनगर शाखेच्या एकांकिकेस द्वितीय क्रमांक मिळाला. चिंतामणीनगर शाखेच्या पायल पांडे हिला स्त्री अभिनयातील प्रथम पारितोषिक, प्रताप सोनाळे यास दिग्दर्शनात प्रथम, चिन्मय कुलकर्णी व शशांक लिमये यांना प्रकाशयोजनेत प्रथम, डॉ. अभय कुलकर्णी यांना पुरुष अभिनयात द्वितीय, सोहम कोळेकर यांना पार्श्वसंगीतासाठी द्वितीय, तर करण यादव यांना नेपथ्यात द्वितीय क्रमांक मिळाला.या एकांकिकेसाठी निखिल पेडणेकर, प्रसाद गद्रे, शफी नायकवडी यांचे कलाकारांना सहकार्य लाभले. यावेळी नाट्यरसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)