पुतळा बसविल्याने सांगलीत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:49 IST2017-08-02T00:49:02+5:302017-08-02T00:49:02+5:30

पुतळा बसविल्याने सांगलीत तणाव
ठळक मुद्देसिंधी समाजाने हा पुतळा हटविण्याची मागणी केल्याने तणाव
ल ोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील मुख्य बसस्थानकाजवळील झुलेलाल चौकातील आयलॅँडमध्ये राष्ट्र विकास सेनेने सोमवारी मध्यरात्री लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसविला. सिंधी समाजाने हा पुतळा हटविण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीवरून राष्टÑ विकास सेनेचे राज्याध्यक्ष आमोस मोरे यांच्यासह ३३ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आमोस मोरे, सुधाकर गायकवाड, फिरोज खान, वर्षा काळे, आशा पवार, शाहरूख खतीब, सॅमसन मोरे, रोहन कोळी व २० ते २५ अनोळखींचा समावेश आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. बेकायदा जमाव जमवून, महापालिका व जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसूवन अतिक्रमण केले; तसेच आयलॅँडचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाटेगाव (ता. वाळवा) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची मंगळवारी जयंती साजरी करण्यात आली. तत्पूर्वी रविवारी मध्यरात्री विविध संघटनांनी कर्मवीर चौकातील जिल्हा बँकेसमोरील बागेत पुतळा बसविला होता. त्यानंतर राष्टÑीय विकास सेनेनेही झुलेलाल चौकातील आयलॅन्डमध्ये सोमवारी मध्यरात्री पुतळा बसविला. या दोन्ही ठिकाणी सोमवारी अण्णा भाऊंची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यासाठी गर्दी होती. राष्टÑीय विकास सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, झुलेलाल चौकात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी अनेक मागासवर्गीय पक्ष संघटनांची मागणी होती. पण शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. यासाठी आंदोलन करून निवेदनही दिले. मात्र निवेदनास नेहमीच केराची टोपली दाखविली. आमचा हक्क हिरावला जात असल्याने आम्ही अण्णा भाऊंचा पुतळा बसवून हक्क स्वत: मिळविला आहे. आमच्याकडून इतर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो. हा पुतळा हलविण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास प्रखर विरोध केला जाईल. या पत्रकावर आमोस मोरे यांच्यासह सेनेच्या ११ पदाधिकाºयांच्या सह्या आहेत. झुलेलाल चौकात अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्यास सिंधी समाजाने विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दिवसभर होता. पोलिस मुख्यालयातील दंगल नियंत्रण पथक व राखीव पोलिसांचे पथकही तैनात केले होते.