सांगलीत दररोज शंभर कुत्री पकडणार
By Admin | Updated: June 22, 2016 00:10 IST2016-06-21T22:53:16+5:302016-06-22T00:10:40+5:30
रवींद्र खेबूडकर : महापालिकेचा कृती आराखडा तयार

सांगलीत दररोज शंभर कुत्री पकडणार
सांगली : शहरात नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढले आहेत. या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून, दररोज शंभर कुत्री पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका मुलीसह सहा महिन्यांच्या बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. या घटनेची महापालिका आयुक्त खेबूडकर यांनी गंभीर दखल घेतली. मंगळवारी महापौर हारुण शिकलगार यांच्या उपस्थितीत आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे व स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खेबूडकर म्हणाले की, महापालिका क्षेत्रात कुत्री पकडण्याची मोहीम तीव्र करीत आहोत. सध्या दररोज ३० कुत्री पकडली जातात. त्याचे प्रमाण शंभरपर्यंत वाढविले जाणार आहे. त्यासाठी दोन सत्रात कुत्री पकडण्याची मोहीम राबविली जाईल. पालिकेकडे दोन डॉग व्हॅन असून, त्यावर आठ कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता जादा प्रशिक्षित सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना कुत्री पकडण्यासाठी जाळ्याही देण्यात आल्या आहेत. त्याचा खर्च महापौरांनी उचलला आहे. नसबंदीसाठी एक एजन्सी नियुक्त करण्यात येत आहे. या एजन्सीकडून पंधरा दिवसाचे काम करून घेतले जाईल. या कालावधीत रितसर निविदा प्रक्रिया राबवून नसबंदीची एजन्सी नियुक्त होईल. जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे यांनी १०० रॅबीपूर लसी देण्याचे मान्य केले आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेने सहकार्य केल्याचे खेबूडकर म्हणाले. (प्रतिनिधी)
चिकन सेंटर्सची आज बैठक
शहरात १९७ चिकन सेंटर व १५० हातगाडे आहेत. त्यांची बुधवारी दुपारी बारा वाजता बैठक आयोजित केली आहे. या सेंटरवरील ओला कचरा उचलण्याबाबत उपाययोजना करणार आहोत. सेंटरचालकांनी स्वत: पिशव्यामधून ओला कचरा जमा करावा. त्यानंतर पालिकेचे दोन कंटेनर शहरात फिरून हा कचरा जमा करतील, असेही खेबूडकर म्हणाले.