- घनशाम नवाथे सांगली - ‘शहाण्याने पोलिस ठाण्याची पायरी चढू नये,’ असे म्हटले जाते. परंतु पोलिस ठाण्यातही नागरिकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण केले जाते, असा सुखद अनुभव घेता येतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे तक्रार निवारण दिनात चक्क पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जत पोलिस ठाण्यात हजर राहून २० तक्रारींचे जागेवर निराकरण केले.
पोलिस ठाणेस्तरावर आणि उपविभागात दर शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. यामध्ये नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर तक्रारदारांच्या तक्रारीचे निराकरण केले जाते. शनिवारी, दि. ८ रोजी तक्रार निवारण दिनात पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वत: जत पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तक्रारीबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस अधिकारी व अंमलदार यांना जागेवर आदेश दिले. त्यांनी जागेवर २० तक्रारींचे निराकरण केले.अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी शहर पोलिस ठाण्यात हजर राहून २४ तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देऊन तक्रारींचे निराकरण केले.
जिल्ह्यात दिवसभरात सांगली शहर उपविभागात १४९ तक्रारींचे, मिरज उपविभागात ४४, तासगाव उपविभागात ४४, विटा उपविभागात २२, इस्लामपूर उपविभागात १०३ आणि जत उपविभागात ७५, अशा एकूण ४३७ तक्रारींचा दिवसभरात निपटारा करण्यात आला. स्वत: वरिष्ठ अधिकारी पोलिस ठाण्यात येऊन तक्रारी ऐकून घेतल्यामुळे तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला. तसेच पोलिस अधिकारी व अंमलदार यांनीही दिलेल्या आदेशाप्रमाणे तातडीने अंमलबजावणी करत तक्रारींचा निपटारा केला.
प्रत्येक शनिवारी पोलिस ठाणे आणि उपविभागीय कार्यालयस्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. नागरिकांच्या तक्रारींचे यामध्ये निराकरण केले जाते. त्यामुळे पोलिस ठाण्यांशी संबंधित असलेल्या तक्रारींचे निराकरण करून घ्यावे.- संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली