सांगली-- ट्रक, दुचाकी चोरट्यास अटक
By Admin | Updated: August 28, 2014 23:05 IST2014-08-28T22:40:38+5:302014-08-28T23:05:16+5:30
एलसीबीची कारवाई : ३२ लाखांच्या तीन ट्रकसह दुचाकी जप्त

सांगली-- ट्रक, दुचाकी चोरट्यास अटक
सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अट्टल चोरटा पैगंबर सिकंदर शेख (वय २६, रा. तासगाव फाटा, मिरज) यास अटक करुन, त्याने चोरी केलेले तीन ट्रक व एक दुचाकी असा सुमारे ३२ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने या वाहनांची चोरी सोलापूर, इचलकरंजी व कर्नाटकातील कागवाड येथून केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आखणीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलीस फौजदार एम. डी. पाटील, हवालदार मारुती सूर्यवंशी, विकास पाटणकर, शशिकांत जाधव आदींचे पथक बुधवारी मिरज शहरात गस्त घालत असता, पैगंबर शेख हा मिरज रेल्वे स्थानक परिसरात वाहनांच्या स्पेअर पार्टची विक्री करीत असताना संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने तीन ट्रक व एक दुचाकी असा एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन ट्रक व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
त्याने सोलापूर, इचलकरंजी व कागवाड (जि. बेळगाव, कर्नाटक) येथून ट्रकची चोरी केली असून, मिरजेतून दुचाकीची चोरी केली आहे. सोलापूर येथून टाटा कंपनीचा (क्र. एमएच ०४, एफपी ९२५२) हा बारा लाखांचा ट्रक चोरला असून, याबाबत सोलापूर येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इचलकरंजी येथून ट्रक (क्र. एमएच ०९. जेए ९१४९) चोरुन तो त्याने तासगाव येथील एक शेतात सोडून दिला. याबाबत इचलकरंजी येथील गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागवाड (जि. बेळगाव) येथून त्याने (क्र. केए. २५ बी २४३४) हा दहा लाखांचा ट्रक चोरी केला असून, अद्याप या ट्रकचा मालक सापडलेला नाही. त्याने या ट्रकचा चेसीस क्रमांक वेल्ड करुन बदलला आहे.
याशिवाय त्याने मिरजेतून हिरो होंडा दुचाकीची (क्र. एमएच १०, एटी १९९४) चोरी केली असून याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत हवालदार शशिकांत जाधव, विकास भोसले, निवास माने, किशोर काबुगडे आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)