सांगली : आली दिवाळी...

By Admin | Updated: October 21, 2014 22:07 IST2014-10-21T22:07:27+5:302014-10-21T22:07:27+5:30

खरेदीसाठी गर्दी : उत्साहाला उधाण; विद्युत रोषणाईने शहर सजले

Sangli: There was Diwali ... | सांगली : आली दिवाळी...

सांगली : आली दिवाळी...

सांगली : विद्युत रोषणाईने सजलेल्या इमारती... आकाशदिव्यांचा लख्ख प्रकाश... दारोदारी रंगलेल्या स्वागताच्या रांगोळ्या... घरोघरीचा फराळ आणि नव्या नवलाईने उत्साहाला आलेले उधाण घेऊन दीपोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. यासाठी जिल्हा सज्ज झाला असून दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या.
मंगळवारी धनत्रयोदशी साजरी करण्यात आली. अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी म्हटले जाते. धन्वंतरी पूजनाने खऱ्याअर्थाने दिवाळीस सुरुवात झाली असली तरी, बुधवारी अभ्यंगस्नानाचा दिवस आहे. त्यामुळे दीपोत्सवाचा झगमगाट बुधवारपासून सुरू होईल. नरकचतुर्दशीच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या बाजारपेठेत खरेदीदार नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मारुती रोड, कापड पेठ, गणपती पेठ याठिकाणचे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. कपडे, उत्सवाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. दिवसभर बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत होती. त्यामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.  शहरातील इमारती, बाजारपेठेतील दुकाने, बँका, संस्था आणि घरोघरी दिव्यांचा लखलखाट दिसत आहे. रांगोळ्या, आरास, रोषणाई यांनी उत्सवात रंग भरला आहे. दिवाळी सुट्टी असल्याने लहान मुलांमधील उत्साहाला उधाण आले आहे. गुरुवारी लक्ष्मीपूजन व शुक्रवारी पाडवा असल्याने त्यासाठीचीही खरेदी अगोदरच केली जात आहे. निवडणुकांची धामधुम संपल्यानंतर आता दिवाळीची धामधुम सुरू झाली आहे. भाऊबीजेपर्यंत दीपोत्सव रंगणार आहे. फटाक्यांचीही बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने यंदा दिवाळीत सांगली शहरासह जिल्ह्यात मोठी आतषबाजीही होणार आहे. (प्रतिनिधी)
वह्या खरेदीसाठी गर्दी
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. विक्रम संवत या दिवसापासून सुरू होते. आर्थिक हिशेबाच्यादृष्टीने व्यापारी वर्ग पाडव्याला नववर्षाची सुरुवात मानतात. नव्या वह्यांचे पूजन करून लक्ष्मीप्राप्तीसाठी व्यापारी नव्या वर्षाचा प्रारंभ करतात. सांगलीतही ही परंपरा कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून वह्या खरेदीसाठी सांगलीतील स्टेशनरी दुकानात गर्दी होत आहे. मंगळवारीही वह्या, कीर्द, खतावणी, तसेच अन्य स्टेशनरी साहित्य खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. पाडवा दोन दिवसांनंतर असला तरी, त्याची पूर्वतयारी सुरू आहे.

Web Title: Sangli: There was Diwali ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.