सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सांगली ग्रामीण पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार दिवसभरात ६४ वाहनांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील जनतेने विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंकली फाटा, बुधगाव, नांद्रे, कवठेपिरान येथे पोलिसांचे पथक गस्तीवर होते. १४ पोलीस कर्मचारी व १८ होमगार्डनी दिवसभरात ६४ वाहने ताब्यात घेत त्यांच्यावर केसेस दाखल केल्या आहेत. दरम्यान, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी केले आहे.