सांगली : अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:38+5:302021-02-05T07:31:38+5:30
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा यापुढे वय वर्ष ७५ ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर परतावा भरण्याची गरज नाही. हा दिलासा ज्येष्ठ नागरिकांसाठी ...

सांगली : अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
यापुढे वय वर्ष ७५ ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर परतावा भरण्याची गरज नाही. हा दिलासा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसंच ‘पेन्शन’मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर यापुढे कोणताही कर लावला जाणार नाही. याचा ज्येष्ठ नागरिकांना निश्चित फायदा होणार आहे. पण, केंद्र सरकारने ज्यांचे उत्पन्नच कमी आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी खास पेन्शन सुरु करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक प्रकाश कुलकर्णी यांनी दिली.
चौकट
शेतकऱ्यांसाठी पोकळ घोषणा
काही वस्तुंवर ॲग्रीकल्चर इन्फ्रा कर लावण्यात येणार आहे, याचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल, अशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात केलीय. परंतु, त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत येण्याची गरज आहे. जादा कर लावल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढणार आहेत. याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे. अर्थसंकल्पात पोकळ घोषणाच झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकरी सुरेश जगताप यांनी दिली.
चौकट
उद्योग वाढीसाठी शून्य प्रयत्न
केंद्र शासनाने अर्थसंकल्प जाहीर करतांना जुन्याच गोष्टी मांडल्या आहेत. ठप्प झालेला उद्योग, व्यापार वाढीसाठी ठोस अशा काहीच उपाययोजना झालेल्या नाहीत. यामुळे व्यापारी आणि त्यावर अवलंबून असणारा कष्टकरी हताश झालेला आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी रवींद्र पाटील यांनी दिली.
चौकट
कृषी क्षेत्रातील संधी पुन्हा दुर्लक्षित
शेती उत्पादनाचा अर्थव्यवहारात बलस्थान म्हणून उपयोग करणे याही अर्थसंकल्पामध्ये शक्य झाले नाही. शेतमाल निर्यात धोरण दीर्घकाळासाठी लवचिक ठेवत निर्यात सुविधा वाढवण्यावर भर द्यायला हवा होता. शेतकऱ्यांना देशातील ग्राहकांवर विसंबून ठेवणे आता योग्य नाही. कृषी क्षेत्रातील संधी पुन्हा दुर्लक्षित केली आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटना सहकार आघाडी राज्य प्रमुख संजय कोले यांनी दिली.