केंद्र सरकारच्या निषेधार्थ सांगलीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST2021-02-05T07:31:45+5:302021-02-05T07:31:45+5:30
सांगली : दिल्ली येथील शांततापूर्ण आंदोलन बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान ...

केंद्र सरकारच्या निषेधार्थ सांगलीत धरणे
सांगली : दिल्ली येथील शांततापूर्ण आंदोलन बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चातर्फे सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी सांगलीतील स्टेशन चौकात शनिवारी धरणे आंदोलन केले.
यावेळी हमाल पंचायतीचे विकास मगदूम, डॉ. संजय पाटील, कॉ. सुमन पुजारी, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. शंकर पुजारी, ॲड. के. डी. शिंदे, भाई ॲड. सुभाष पाटील, कॉ. धनाजी गुरव, बाळासाहेब पाटील, ॲड. कृष्णा पाटील, कॉ. सुधीर नलवडे, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
डॉ. गुरव म्हणाले की, महात्मा गांधी यांची आजच्या दिवशी जातीयवादी शक्तीने हत्या केली होती. याच विचाराचे सध्या केंद्रातील सरकार असल्यामुळे ते शेतकरी आणि कामगारविरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी धरणे आंदोलन करीत आहोत. शेतकऱ्यांचे शांततामय आंदोलन पहिल्यांदा बदनाम करायचे व नंतर बळाचा वापर करून ते मोडून काढायचे हे षङ्यंत्र सत्ताधाऱ्यांचे आहे. यामुळे शेतकरी बदनाम होणार नाही आणि आंदोलनही मागे घेणार नाही. जोपर्यंत शेतकरी आणि कामगारविरोधी कायदे मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत.
कॉ. शंकर पुजारी म्हणाले, आंदोलने मोडीत काढण्यापेक्षा केंद्राने शेतकऱ्यांना त्रासदायी असणारे तीन कायदे मागे घेण्याची गरज आहे, पण हट्टी सरकार ते कायदे मागे घेण्यापेक्षा शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात समाधानी मानत आहे.