सांगलीचे कारागृह कैद्यांनी खचाखच

By Admin | Updated: June 14, 2016 00:04 IST2016-06-14T00:02:02+5:302016-06-14T00:04:01+5:30

क्षमता ओलांडली : ३६२ कैदी; कारागृह स्थलांतराचा प्रस्ताव धूळ खात

Sangli prison jailed with prisons | सांगलीचे कारागृह कैद्यांनी खचाखच

सांगलीचे कारागृह कैद्यांनी खचाखच

सचिन लाड -- सांगली सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी क्षमता ओलांडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सव्वादोनशे क्षमता असलेल्या या कारागृहाने क्षमता ओलांडली आहे. सध्या कारागृहात ३६२ कैदी आहेत. यामध्ये महिला कैदीही आहेत. दिवसेंदिवस कैद्यांची संख्या वाढत असल्याने कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतर करण्यासाठी शासनाकडे सादर केलेला प्रस्तावही धूळ खात पडला आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्यात स्वतंत्रपूर (ता. आटपाडी) येथे खुले कारागृह आहे. याठिकाणी शिक्षा लागलेल्या कैद्यांना कुटुंबासह राहण्याची परवानगी दिली जाते. सांगली जिल्हा कारागृहात कच्चे कैदी ठेवले जातात. दोन-तीन महिने शिक्षा झालेल्या कैद्यांनाही येथे ठेवले जाते.
पण त्यापेक्षा जादा शिक्षा झालेल्या कैद्यांना कोल्हापुरातील कळंबा किंवा पुण्यातील येरवडा कारागृहात पाठविले जाते. २३५ क्षमता असलेले सांगलीचे कारागृह आहे. यामध्ये २०५ पुरुष व ३० महिलांना ठेवता येते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढत होतच राहिल्याने कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या वाढत गेली. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांतील कैदी येथे आहेत.
विशेषत: खुनाच्या गुन्ह्यांतील कैद्यांची संख्या मोठी आहे. कैद्यांची संख्या वाढत असली तरी, त्या तुलनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्टाफ अपुरा आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सोमवारअखेर कैद्यांची संख्या ३६२ होती. दोन-चार कैदी जामिनावर बाहेर पडत असले तरी, तेवढेच नव्याने आत येतात. त्यामुळे कैद्यांच्या या संख्येत नेहमीच चढ-उतार होत राहिला आहे. पण साडेतीनशेचा आकडा गेल्या काही महिन्यात कधीच खाली आलेला नाही. कारागृहाच्या परिसरात टोलेजंग इमारती तयार झाल्या आहेत. त्यामुळे कारागृहात धोका असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
पटवर्धन हायस्कूलचे छत तसेच परिसरातील इमारतींमधून कारागृहातील सर्व परिसर, बऱ्याक तसेच कैदी स्पष्टपणे दिसतात. कारागृहाच्या तत्कालीन महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी गतवर्षी या कारागृहास भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यांनाही सुरक्षिततेच्याबाबतीत अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी हे कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे स्थलांतराला गती आली होती.


सुरक्षेचा प्रश्न : बांधकामाला अखेर बंदी!
कारागृहाला सुरक्षिततेच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह परिसरात दोनशे मीटर अंतरावर नवीन बांधकाम करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी कारागृहाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांची दोन महिन्यांपूर्वी सांगलीत बैठकही झाली आहे. पण जुनी बांधकामेही कारागृहाच्या परिसरात धोक्याची बनली आहेत. यासाठी कवलापूर येथील नियोजित विमानतळाच्या जागेवर कारागृह स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तत्कालीन अधीक्षक एम. एस. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. शासनाने मंजुरी दिल्यास कारागृह व अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही तेथे बांधली जाणार आहेत.

Web Title: Sangli prison jailed with prisons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.