सांगली : महापालिकेने एलबीटी वसुलीसाठी बँक खाती सील केल्यानंतर, कर भरण्याकडे व्यापाऱ्यांचा कल वाढला आहे. गेल्या चार दिवसात तब्बल अडीच कोटी रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. महापालिका आयुक्त अजिज कारचे, एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी कर वसुलीसाठी व्यापाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. गत आठवड्यात ३५ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याविरोधात एलबीटीविरोधी कृती समितीने काल, सोमवारी व्यापार बंद आंदोलन पुकारले होते. त्यालाही संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यात आयुक्तांनी व्यापारी शिष्टमंडळाची शिष्टाई फेटाळल्याने एलबीटी विभागही आक्रमक झाला आहे. गेल्या चार दिवसात पालिकेच्या तिजोरीत करापोटी तब्बल अडीच कोटीची भर पडली आहे. काल व्यापार बंद असतानाही सुमारे २० लाख रुपये जमा झाले, तर रविवारी तब्बल ९० लाख रुपयांचा भर व्यापाऱ्यांनी जमा केला होता. तत्पूर्वी दोन दिवसात सव्वा कोटीची वसुली झाली होती. व्यापाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आवाहन करूनही कर भरलेला नाही. त्यामुळे आता कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहेत. सुरुवातीला नोंदणी व कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील व्यापाऱ्यांकडून विवरणपत्रेही मागविण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
सांगली पालिकेच्या तिजोरीत अडीच कोटी एलबीटी वसूल
By admin | Updated: August 26, 2014 22:51 IST