सांगली : सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले ३१ मोबाईल मोबाईलमालकांना परत करण्यात आले. अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते फिर्यादींना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम सोमवारी भारती महाविद्यालयाच्या सभागृहात झाला.या मोबाईलची एकूण किंमत ३ लाख ७७ हजार ५०० रूपये होते. यावेळी शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संजय मोरे आदी उपस्थित होते. हे मोबाईल हस्तगत करण्यासाठी परिश्रम घेणारे गुन्हे अन्वेषण पथकाचे उपनिरीक्षक महादेव पोवार, हवालदार मच्छिंद्र बर्डे, संदीप पाटील, संतोष गळवे, सुमित सूर्यवंशी, संदीप भागवत, कॅप्टन गुंडेवाडे यांचाही सत्कार अधीक्षकांनी केला. गेल्या काही महिन्यांत शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. विशेषत: आठवडी बाजार, बस स्थानक आदी परिसरात मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. पोलिसांनी सायबर तपासासह तांत्रिक अन्वेषणाद्वारे मोबाईलचा शोध लावण्यात यश मिळविले.
पावणेचार लाखांचे मोबाईल सांगली पोलिसांनी शोधून परत केले
By संतोष भिसे | Updated: June 24, 2024 16:08 IST