सांगली पोलीस ठरले स्मार्ट पोलीस दल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:31 IST2021-08-17T04:31:25+5:302021-08-17T04:31:25+5:30
सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस ठाणे प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज ...

सांगली पोलीस ठरले स्मार्ट पोलीस दल
सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस ठाणे प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चांगल्या कामाच्या माध्यमातून आदर्श पोलिसाची प्रतिमा निर्माण करण्यात सांगली पोलीस दल यशस्वी झाले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयएसओ स्मार्ट पोलीस ठाणे प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
ई-पेट्रोलिंग ॲप, ई-लायब्ररी ॲपचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. चोरीचा मुद्देमाल त्यांच्या हस्ते मूळमालकांना परत करण्यात आला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ई-पेट्रोलिंगमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. आधुनिक तंत्रांच्या आधारे गुन्हे करणाऱ्यांचे लोकेशन ॲपच्या माध्यमातून ट्रॅक करता येईल. पोलीस स्थानके सुधारण्यासाठी पोलीसप्रमुखांनी विशेष प्रयत्न केले. सार्वजनिक बांधकामानेही साथ दिली. त्यामुळे पोलीस ठाणी आदर्श झाली आहेत. आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान मिळाल्यास पोलीस अधिक आक्रमक काम करतील. कोविड काळात उत्तम काम केले. पहिल्या लाटेत कठोर कारवाईमुळे लाट आटोक्यात आणता आली.
महानिरीक्षक लोहिया म्हणाले, परिक्षेत्रात सांगली पोलिसांनी आधुनिक पद्धतीने काम करून चांगला आदर्श घातला आहे. पोलिसांना प्रतिमा चांगली राखावी लागते. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून योग्य वापराद्वारे प्रतिमा सुधारू शकते. कोरोनामध्ये कायदा व सुव्यवस्था चांगली राखली. मुदतबाह्य कागदपत्रांच्या वर्गीकरणाद्वारे अनावश्यक सात टन रद्दी काढली. कार्यालयात नीटनेटकेपणा ठेवल्याने आयएसओ मानांकन मिळाले.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनीही पोलिसांचे कौतुक केले. सांगली पोलीस दल भविष्यात स्मार्ट पोलीस दल म्हणून ओळखले जाईल असे ते म्हणाले. अधीक्षक गेडाम म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सुमारे ८०० पुस्तके ॲपवर मोफत उपलब्ध आहेत. ही संख्या पाच हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
यावेळी विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.