सांगली-पेठ रस्ता पुन्हा खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:29 IST2021-09-05T04:29:52+5:302021-09-05T04:29:52+5:30

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पेठ ते सांगली रस्ता पुन्हा खड्ड्यांनी भरला आहे. वर्षभरापूर्वी तो दुरूस्त झाला, ...

Sangli-Peth road again in a ditch | सांगली-पेठ रस्ता पुन्हा खड्ड्यात

सांगली-पेठ रस्ता पुन्हा खड्ड्यात

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पेठ ते सांगली रस्ता पुन्हा खड्ड्यांनी भरला आहे. वर्षभरापूर्वी तो दुरूस्त झाला, पण आता पावसाळ्यामुळे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट केलेल्या या रस्त्याच्या खस्ता संपत नाहीत. सर्वपक्षीय आश्वासनांचा केवळ पाऊस पडला, प्रत्यक्षात रस्त्यावरील ना खड्डे गेले, ना रस्त्याची पुनर्बांधणी झाली.

पेठ ते सांगली हा रस्ता पूर्वी राज्य महामार्गाचा भाग होता. २०१७ पासून या रस्त्याच्या प्रश्नावरून सामाजिक संघटनांनी विविध आंदोलने केली. सर्वच पक्षाच्या नेत्यांना आंदोलकांनी धारेवर धरले. अशा रस्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची नावे देण्याचे आंदोलन केल्यानंतर गुजरातमधील वृत्तपत्रांनीही त्याची दखल घेतली. अखेर गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट केला. वर्षभरापूर्वी तो दुरूस्त झाला. मात्र जुलै आणि ऑगस्टमधील धुंवाधार पावसाने डांबर वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

चौकट

रस्त्याचे ‘हालचाल’ रजिस्टर

केंद्र शासनाने पेठनाका-सांगली-मिरज हा एकूण ५५ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ एच घोषित केला आहे. त्यापैकी पेठनाका ते सांगली हा ४१ किलोमीटरचा मार्ग आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण व दर्जोन्नती करण्याचे काम मंत्रालयाने २०२१-२२ च्या वार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट केले आहे. याचा प्रकल्प अहवाल राष्ट्रीय महामार्गाच्या प्रादेशिक विभागाने मंत्रालयाकडे सादर केला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये हा रस्ता राष्ट्रीय प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती.

चौकट

गडकरींनी जाहीर केलेला निधी गेला कोठे?

नितीन गडकरी यांनी ४ एप्रिल २०२१ रोजी पेठ ते सांगली या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी २२ कोटी ६२ लाख रुपये मंजूर केल्याची घोषणा केली होती. ट्विटरवर त्याचा उल्लेखही केला होता. आता सप्टेंबर उजाडला, तरी या प्रकल्पाची फाईल हललेली नाही.

चौकट

जयंत पाटील आले चर्चेत

राज्यात विरोधात असताना ३ सप्टेंबर २०१८ रोजी ‘खड्डा वुईथ सेल्फी’ म्हणून जयंत पाटील यांनी या रस्त्याबद्दल पोस्ट टाकली होती. नागरिक जागृती मंचने या जुन्या पोस्टवरून पालकमंत्री जयंत पाटील यांना ट्रोल करीत ‘आता सत्तेत असताना तुम्ही हे काम मार्गी लावावे’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

चौकट

रस्त्यावरील भार मोठा

रस्त्यावरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१८ मध्ये नोंदविलेल्या निरीक्षणानुसार या रस्त्यावर दररोज सरासरी ५१ हजार टनाचा भार पडत आहे. हा भार आता ६० हजार टनावर गेल्याचा अंदाज आहे.

चौकट

दररोज इतक्या वाहनांची आहे वर्दळ

जीप व मोटार ६००० ते ७०००

दुचाकी ५,५००

अवजड वाहने ३०००

प्रवासी वाहने ८००

Web Title: Sangli-Peth road again in a ditch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.