सांगलीत नारायण राणेंच्या पोस्टरला काळे फासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:10+5:302021-08-25T04:31:10+5:30
फोटो ओळी २४ सांगली ०१ : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सांगलीतील भाजप कार्यालयासमोरील पोस्टरला मंगळवारी शिवसैनिकांनी काळे ...

सांगलीत नारायण राणेंच्या पोस्टरला काळे फासले
फोटो ओळी २४ सांगली ०१ : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सांगलीतील भाजप कार्यालयासमोरील पोस्टरला मंगळवारी शिवसैनिकांनी काळे फासले.
२४ सांगली ०२ : सांगलीतील स्टेशन चौकात शिवसेनेच्या वतीने नारायण राणेंच्या पोस्टरला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आले.
२४ सांगली ०३ : भाजपच्या वतीने मंगळवारी शिवसेनेच्या आंदोलनास उत्तर देत राणेंच्या पोस्टला दुग्धाभिषेक घालत शिवसेनेविरोधात निदर्शने केली. यावेळी आ.सुधीर गाडगीळ, धीरज सूर्यवंशी, मुन्ना कुरणे, दीपक माने उपस्थित होते.
२४ सांगली ०४ : शिवसेनेच्या वतीने सांगलीत नारायण राणे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी बजरंग पाटील, महेंद्र चंडाळे, सुनीता मोरे, अनिल शेटे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सांगलीतील भाजप कार्यालयासमोरील पोस्टरला मंगळवारी शिवसैनिकांनी काळे फासले. यानंतर, स्टेशन चाैकात शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली. दुसरीकडे भाजपनेही शिवसेनेच्या कृतीचा निषेध करीत निदर्शने केली.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद मंगळवारी सांगलीत उमटले. शिवसेना व भाजप यावरून आमने-सामने आले. सांगलीतील भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर नारायण राणेंच्या अभिनंदनाचा फलक आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर व विश्रामबाग विभागप्रमुख अमोल कांबळे हे त्या ठिकाणी आले. कांबळे यांनी बाटलीत भरलेली शाई नारायण राणेंच्या फलकावर टाकून काळे फासले. त्यानंतर, शिवसेनेने सांगलीच्या स्टेशन चौकात नारायण राणेंच्या विरोधात निदर्शने केली. राणेंच्या पोस्टला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आले. ‘नारायण राणे कोंबडी चोर’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी बजरंग पाटील, अनिल शेटे, मयूर घोडके, सुनीता मोरे, महेंद्र चंडाळे आदी सहभागी झाले होते.
भाजपनेही गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली व नारायण राणेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी दिलेल्या निवेदनात भाजपने म्हटले आहे की, शिवसेनेच्या विकृत प्रवृत्तीच्या काही कार्यकर्त्यांनी जमाव करून राणेंच्या पोस्टरवर शाई फेकली. अश्लील व विकृत घोषणा देत, वैयक्तिक पातळीवर टीका करीत त्यांनी दहशतीचे दर्शन घडविले आहे. जनमानसात उद्रेक होईल व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जाऊन काही अघटित होण्याची अपेक्षा शिवसेनेची आहे. त्यामुळे संबंधित शिवसैनिकांवर पोलिसांनी कारवाई करून तातडीने त्यांना अटक करावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक सेलचे आश्रफ वांकर यांनी केली आहे. आंदोलनात आ.सुधीर गाडगीळ, मुन्ना कुरणे, धीरज सूर्यवंशी, अमर पडळकर, दीपक माने आदी सहभागी झाले होते.
चौकट
जशास तसे उत्तर देऊ : विभुते
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पत्रकात म्हटले आहे की, खालच्या थराचे व विकृत राजकारण भाजप, तसेच नारायण राणेंकडून करण्यात येत आहे. आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ. राणेंना सांगलीत यापुढे पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
चौकट
शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात
राणेंच्या पोस्टरला काळे फासल्यानंतर, अमोल कांबळे व शंभोराज काटकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतरही शिवसेनेने आंदोलन
सुरूच ठेवले.