Sangli MP's decision today | सांगलीच्या खासदाराचा आज फैसला

सांगलीच्या खासदाराचा आज फैसला

सांगली : संपूर्ण राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील लढतीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. तुल्यबळ उमेदवार, चुरशीने झालेला प्रचार, दिग्गज नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा, मतदानाचा वाढलेला टक्का यामुळे निकालाविषयीची उत्सुकता सर्वत्र दिसत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधीही तिरंगी लढत झाली नाही. एकतर्फी किंवा दुरंगी असाच सामना येथील नागरिकांनी नेहमी अनुभवला होता. यंदा भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर असे तीन दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांच्या प्रचारसभांनी वातावरण तापविले होते. आरोप-प्रत्यारोप तसेच ताकदीचे प्रदर्शन करीत उमेदवारांनी, कार्यकर्त्यांनी तसेच राज्य व राष्टÑीय स्तरावरील नेत्यांनी रंग भरला होता. गत निवडणुकीत कॉँग्रेसचा बालेकिल्ला हस्तगत करीत भाजपने ताकद सिद्ध केली होती, मात्र मागील निवडणुकीत मोदी लाटेचा परिणाम असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीची परीक्षा यानिमित्ताने होत आहे. राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीही त्यांचे राजकीय कौशल्य या निवडणुकीत पणाला लावले आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या ताकदीचा लेखाजोखा मांडण्याचे काम निकालातून होणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?
सांगली : मतमोजणीची प्रक्रिया फेरीनिहाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होत असते. त्यामुळे निकालाविषयी आणि प्रत्येक फेरीनिहाय येणाऱ्या आकडेवारीविषयी नेहमीच कुतूहल व्यक्त होत असते. ही प्रक्रिया नेमकी चालणार कशी, त्याला किती वेळ लागणार, याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

येथे होणार मतमोजणी
मिरजेतील शासकीय धान्य गोदामात (सेंट्रल वेअर हाऊस) गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. प्रशासनाकडून याची सर्व ती तयारी पूर्ण करण्यात येत आहे. यावेळी प्रथमच सैनिक मतदारांची मोजणी स्कॅनिंगद्वारे करण्यात येणार असल्याने मतमोजणीस विलंब लागणार आहे

अशा होणार फेºया
सहा विधानसभा मतदारसंघनिहाय २० टेबलांवर मतमोजणी होणार आहे. यात सर्वात कमी १५ फेºया जत मतदारसंघातील होतील, तर सर्वाधिक १८ फेºया खानापूर मतदारसंघातील होणार आहेत. एका फेरीमध्ये १२० मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे. फेरीनिहाय निकाल अंतिम झाल्यानंतर ते घोषित केले जाणार आहेत.

कर्मचारी व पोलीस बंदोबस्त
मतमोजणीसाठी ५९२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या संपूर्ण प्रक्रियेत सर्व कर्मचारी व पोलिसांसह २५०० अधिकारी, कर्मचाºयांचा मतमोजणी प्रक्रियेत सहभाग असणार आहे. निकाल ऐकण्यासाठी येणाºया कार्यकर्त्यांची जिल्हा क्रीडा संकुल परिसरात सोय केली आहे. सांगली-मिरज रोड परिसरातच सर्वांना थांबविण्यात येणार आहे.

कधी लागणार निकाल
दुपारी चारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल. मात्र, टपाली मतदानाची मोजणी, मतदान यंत्रांतील मतांची मोजणी व व्हीव्हीपॅट स्लिपांची मोजणी यामुळे रात्री १२ ते मध्यरात्री २ पर्यंत अंतिम अधिकृत निकाल जाहीर होऊ शकतो. त्याबरोबरच अ‍ॅपच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांना निकाल पाहता येणार आहे.

Web Title: Sangli MP's decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.