सांगलीत मनसे पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:15+5:302021-02-08T04:23:15+5:30
सांगली : सात वर्षांपासून रिक्त असलेले संपर्क अध्यक्षपद, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेले दुर्लक्ष व अन्य कारणांमुळे सांगली जिल्ह्यातील ...

सांगलीत मनसे पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे
सांगली : सात वर्षांपासून रिक्त असलेले संपर्क अध्यक्षपद, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेले दुर्लक्ष व अन्य कारणांमुळे सांगली जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हाध्यक्षांकडे संयुक्तपणे राजीनामे सादर केले. पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
जिल्ह्यात यापूर्वीच अस्तित्वासाठी झगडत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता सक्रिय कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आहे तेवढी ताकद टिकविण्यासाठी गेल्या काही वर्षांत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. पक्षाकडून कधीही पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बळ मिळाले नाही. गेल्या सात वर्षांपासून संपर्क अध्यक्षपदही रिक्त आहे. त्यामुळे पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांना नाराजी धुमसत होती.
पक्षांतर्गत नाराजीचा स्फोट रविवारी झाला. जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले, जिल्हा सचिव आशिष कोरी, महापालिका क्षेत्राध्यक्ष विनय पाटील, सांगली शहराध्यक्ष दयानंद मलपे, कुपवाड शहर सचिव सागर चव्हाण यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडे राजीनामे दिले.
राजीनामा देताना यापुढे सामान्य सैनिक म्हणून पक्षाच्या कार्यात सहभागी होऊ, असे म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा मनसेमध्ये पक्षांतर्गत नाराजीचे प्रकार अनेकदा घडले आहेत; पण इतक्या मोठ्या प्रमाणावर राजीनामे देण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे.
चौकट
सक्रिय पदाधिकारी
राजीनामा दिलेल्यांमध्ये सर्व पदाधिकारी सक्रिय होते. शहरातील अनेक प्रश्नांवर आंदोलने करणे, संघर्ष करणे यांबाबत ते आघाडीवर होते. आशिष कोरी व संदीप टेंगले यांनी पक्षाच्या अस्तित्वाचा झेंडा हाती घेतला होता. या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्याने पक्षाला धक्का बसला आहे.