नवी मुंबईपेक्षा सांगली, मिरजेची पाणीपट्टी जास्त
By Admin | Updated: September 5, 2015 23:33 IST2015-09-05T23:32:01+5:302015-09-05T23:33:03+5:30
आयुक्तांना निवेदन : पिंपरी-चिंचवड, कोल्हापूरचाही दर कमी

नवी मुंबईपेक्षा सांगली, मिरजेची पाणीपट्टी जास्त
सांगली : पाणीदराबाबत संपूर्ण राज्यात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकाच महागडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईचा प्रति हजार लिटरचा दर ४ रुपये ७५ पैसे असताना सांगलीचा दर आठ रुपये प्रति हजार लिटर आहे. त्यामुळे मीटरप्रमाणे बिलवसुली करण्यापूर्वी पाण्याचे दर कमी करण्याबाबतचे निवेदन शनिवारी मदनभाऊ युवामंचच्यावतीने आयुक्त अजिज कारचे यांना देण्यात आले.
पाणी खासगीकरणासाठी सत्ताधारी काँग्रेस सरसावली असतानाच काँग्रेसचाच एक घटक असलेल्या मदनभाऊ युवामंचने खासगीकरणालाच विरोध दर्शविला आहे. या धोरणातील त्रुटींवरच त्यांनी बोट ठेवले आहे. युवामंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या पाणीदराची कागदपत्रे गोळा करून आयुक्तांकडे सादर केली आहेत. राज्यात कोणत्याही महापालिकेचा दर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेएवढा नाही. याठिकाणचा दर सर्वाधिक असल्यामुळे मीटर सुरू करून पाणीआकारणी चालू झाली तर लोकांना प्रतिमाह ५०० रुपयांपर्यंत पाणीपट्टी येऊ शकते. त्यामुळे या दराने पाणीपट्टी परवडणारी नाही. याशिवाय महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा व नगरसेवकांचा हस्तक्षेप यामुळे पाणीपट्टी वसुली समाधानकारक होत नाही, असे मत युवामंचने मांडले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंगिकारलेली खासगीकरणाची पद्धत अन्य कोणत्याही महापालिकेने स्वीकारली नाही. त्यामुळे ही एक आदर्श व चांगली पद्धत आहे, असे म्हणता येत नाही. तसेच महापालिकेने गेल्या दहा वर्षात ज्या गोष्टी खासगी यंत्रणेमार्फत केल्या आहेत, त्या यशस्वी झालेल्या नाहीत. याऊलट अशा माध्यमातून महापालिकेचे नुकसानच झाले आहे. एचसीएल कंपनी, चोवीस तास पाणीपुरवठा, झोपडपट्टी सर्वेक्षण, सेंट्रल लाईट सर्व्हे, शेल्टर, दलाल अशा अनेक माध्यमातून महापालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा महसूल वाढला पाहिजे. पाणीगळती रोखून जादा पाणीवापर करणाऱ्यांवर अंकुश ठेवावाच लागेल. मात्र, या गोष्टी करताना प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होता कामा नये. मीटरप्रमाणे पाणी आकारणीस कोणाचाही विरोध नाही. मात्र त्यापूर्वी अन्य महापालिकांच्या पाणीदराचा विचार करून आपला पाणीदर कमी करावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. (प्रतिनिधी)