सांगली, मिरजेत मोहरमची सांगता
By Admin | Updated: October 25, 2015 00:46 IST2015-10-25T00:43:44+5:302015-10-25T00:46:44+5:30
सरबताचे वाटप : चाळीसहून अधिक मंडळांचा समावेश, मिरवणुकांना गर्दी

सांगली, मिरजेत मोहरमची सांगता
सांगली : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमची सांगता शनिवारी पंजा व ताबूताच्या विसर्जन मिरवणुकीने करण्यात आली. यावेळी सरबताचे वाटप करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ४० हून अधिक मंडळांची मिरवणूक सुरू होती.
मोहरमनिमित्त पाच दिवसांपूर्वी शहरामध्ये पीर, पंजे व ताबूतांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये चिमगीशा मंडळ, उंट कारखाना मंडळ, स्टेशन चौकातील नवजवान मोहरम मंडळ, बदाम चौकातील हिंदू-मुस्लिम मंडळ, गावभागातील हिंदू शिकलगार मंडळ, झाशी चौक मंडळ आदींचा समावेश होता. मोहरमच्या दुसऱ्या दिवसापासून पंजे भेटीचा कार्यक्रम झाला. काल रात्री कत्तलरात्र (अलावा) झाली. सकाळपासून मंडळांकडून सरबताचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)
मिरजेत मिरवणुकीत दोनशे वाहने
मिरज : मिरजेत पंजांच्या चौथ्या भेटीने व सरबत गाड्यांच्या मिरवणुकीने शनिवारी मोहरमचा समारोप झाला. पहाटे बाराईमाम दर्गा परिसरात पंजांच्या भेटीनंतर दुपारी मिरवणुकीने सरबत वाटप करण्यात आले. मिरवणूक मार्गावर महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, संघटनांतर्फे सरबत गाड्यांचे स्वागत करण्यात आले. बाराईमाम दर्ग्यात शनिवारी पहाटे मीरासाहेब दर्ग्यातील पंजांची चौथी भेट पार पडली. पंजांच्या भेटीसाठी भाविकांची मोठी गर्दी होती. भेटीनंतर सायंकाळी पंजांचे विसर्जन झाले. मानाच्या बैलगाड्या नगाऱ्यासह पारंपरिक वांद्याच्या गजरात मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीत कमानवेस मित्र मंडळ, बोलवाड येथील बारगीर यांचा मानाचा ताबूत सहभागी होता. सुमारे २०० वाहने मिरवणुकीत सहभागी होती.
राजकीय क्षेत्रातील दोन पिरांच्या अनुपस्थितीची चर्चा!
माजी मंत्री मदन पाटील व माजी आ. संभाजी पवार हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असले तरी, त्यांची प्रत्येकवर्षी बदाम चौकात मोहरमनिमित्त गाठभेट होत होती. यावेळी त्यांची दिलखुलास चर्चाही व्हायची. या भेटीला अनेकजण गमतीने पिराच्या भेटीही म्हणायचे. मदन पाटील यांचे निधन झाल्यामुळे त्यांची अनुपस्थिती कार्यकर्त्यांना जाणवली. संभाजी पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे तेही येऊ शकले नाहीत. सर्व मोहरम मंडळांच्यावतीने पंजाच्या भेटी सुरू होण्यापूर्वी मदन पाटील यांना बदाम चौकात श्रध्दांजली वाहण्यात आली.
सांगलीत शोकयात्रा
इराणी व खोजा समाजाकडून मोहरमनिमित्त शोकयात्रा काढण्यात आली. यात्रेदरम्यान सरबताचे वाटप करण्यात आले. शोकयात्रेचा प्रारंभ खोजा कॉलनीतून करण्यात आला. ही यात्रा सह्याद्रीनगर, राममंदिर, स्टेशन चौक, हरभट रोड मार्गे कृष्णा घाटावर नेण्यात आली. हुसैनी ग्रुप व खोजा अशरी समाजाच्यावतीने आपटा पोलीस चौकीजवळील पटांगण व आंबेडकर क्रीडांगणात विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मौलाना मोहम्मद हुसेन, मौलाना अब्बास हसनी, मौलाना शेख हसन अली यांची यावेळी धार्मिक प्रवचने झाली. याचे संयोजन महंमदभाई रमाजवणी, अकबरभाई भोजानी, अब्बासभाई राजानी, महंमदअली कलवाणी, शब्बीरभाई नयानी आदींनी केले.