सांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:04+5:302021-02-09T04:29:04+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक ...

The Sangli-Miraj road looks beautiful, but unsafe and deadly | सांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणा

सांगली-मिरज रस्ता दिसायला देखणा, पण असुरक्षित आणि जीवघेणा

सांगली : महापालिका क्षेत्रातील एकमेव सुस्थितीत असणारा सांगली-मिरज रस्ता आता सुरक्षित राहिलेला नाही. सार्वजनिक बांधकामच्या बेफिकिरीमुळे ठिकठिकाणी अपघातांचे ब्लॅक स्पॉट निर्माण झालेत. अपघात टाळण्यासाठी पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे, पण त्यासाठी तीस-पस्तीस लाखांच्या निधीलाही हा विभाग महाग झाला आहे.

पीडब्ल्युडीच्या बेफिकिरीने वर्ष-सहा महिन्यांत अनेकांचे बळी गेलेत. अशास्त्रीय पद्धतीच्या गतिरोधकांमुळे हकनाक प्राण गमवावे लागलेत. पीडब्ल्युडीच्या अन्य रस्त्यांकडे फारसे कुणी बघत नाही, पण सांगली-मिरज रस्ता सर्वाधिक वर्दळीचा आणि महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांना त्याचे गांभीर्य नसल्याचे जाणवते. रस्त्यावरील पांढरे पट्टे गायब झाले आहेत. नव्याने मारण्याचे कोणतेच नियोजन पीडब्ल्युडीकडे नाही. गेल्या पावसाळ्यानंतर रस्त्याचे घिरडे झाले होते, दुरुस्तीला तीन-चार महिने लागले, तोपर्यंत सांगली-मिरजकरांना वनवास सोसावा लागला.

गतिरोधकांवर पट्टे नसल्याने सर्वाधिक अपघात होत आहेत. जीएसटी कार्यालय, सिद्धिविनायक रुग्णालय, कृपामाई रुग्णालय, भारती रुग्णालय, वानलेसवाडी, विजयनगर, पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समिती येथील गतिरोधक अत्यंत जीवघेणे आहेत. भारती रुग्णालयासमोरील गतिरोधकांना तर कोणताच शास्त्रीय ताळतंत्र नाही. गतिरोधकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते समितीची परवानगी लागते, पण सांगली-मिरज रस्त्यावर गतिरोधक बनवणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहितीच नसावी असे दिसते.

सहा मार्गिकांचा हा रस्ता देखणा असला तरी तो आता सुरक्षित राहिलेला नाही. साईड पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक व सिग्नलजवळील पट्टे, दुभाजक पट्टे नसल्याने वाहतूक अस्ताव्यस्त सुरू आहे. पट्ट्यांसाठी सुमारे तीस ते पस्तीस लाखांची गरज आहे, पण तो उपलब्ध करण्याची मानसिकता सार्वजनिक बांधकामकडे नाही. आमदार सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून गांधी चौकापासून भारती रुग्णालयापर्यंत हायमास्ट दिवे बसविले, पण दुरुस्तीअभावी सर्वत्र अंधार पसरला आहे.

चौकट

द्विवार्षिक निधीच्या उधळपट्टीचे परिणाम

या रस्त्यासाठीचा द्विवार्षिक निधी एकाच वर्षात संपविल्याचे परिणाम आता दिसू लागलेत. देखभाल-दुरुस्तीसाठी निधीच नसल्याने नागरिकांचा वनवास सुरू झाला आहे.

Web Title: The Sangli-Miraj road looks beautiful, but unsafe and deadly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.