गाड्या नसल्याने सांगली, मिरज रेल्वेस्थानके सुनसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:30+5:302021-03-13T04:49:30+5:30
सांगली : रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १० रुपयांवरून थेट ५० रुपये केली, त्याचा चांगला धसका स्थानकातील अनावश्यक गर्दीने घेतला ...

गाड्या नसल्याने सांगली, मिरज रेल्वेस्थानके सुनसान
सांगली : रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १० रुपयांवरून थेट ५० रुपये केली, त्याचा चांगला धसका स्थानकातील अनावश्यक गर्दीने घेतला आहे. फलाटावर निवांत फिरायला येणारी गर्दी गायब झाली असून सांगली व मिरजेची स्थानके दिवसभर सताड रिकामी असतात. एखादी गाडी येते, तेव्हाच थोडीशी गर्दी होते, त्यानंतर अर्ध्या तासांत स्थानक पुन्हा सुनसान होते.
मिरज व सांगली स्थानकातून सध्या दररोज १२ गाड्या धावतात. आरक्षण केल्याशिवाय रेल्वेत प्रवेश मिळत नाही, त्यामुळे स्थानकांत सध्या फक्त आरक्षण खिडक्याच सुरू आहेत. प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री पूर्ण बंद आहे शिवाय पॅसेंजर गाड्या बंद असल्याने साध्या तिकिटाची काऊंटर्सगेखील वर्षभरापासून बंद आहेत. फक्त एक्स्प्रेस गाड्या सुरू असून त्यासाठी आरक्षण असेल तरच स्थानकात प्रवेश मिळतो.
कोरोना रोखण्यासाठी गर्दी कमी करणे आवश्यक होते. हे ओळखून रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत पाचपटीने वाढविली. सध्या सांगली-मिरजेत या तिकिटांची विक्री सुरू नसली तरी तिकीट तपासणीसाने पकडल्यास त्या पटीने दंडाची वसुली होते. याचा धसका घेऊन स्थानकात अनावश्यक लोक येईनासे झाले आहेत. दोन्ही स्थानकांत दिवसभरात कधीही गेलात तरी पाच-पंचवीसहून अधिक लोक दिसत नाहीत. एखाद्या ग्रामीण स्थानकाप्रमाणे शांतता असते.
चौकट
सध्या दररोज हजारभर प्रवासी
आरक्षित तिकिटाद्वारे प्रवासासाठी मिरज स्थानकातील खिडकीत दररोज सरासरी २५० आसने बुक होतात. इंटरनेटवरून दररोज सरासरी ६०० ते ८०० तिकिटे आरक्षित होतात असे मुख्य तिकीट निरीक्षक पांडुरंग मराठे यांनी सांगितले. चोवीस तासांत बारा गाड्या धावतात, त्यामधून सुमारे हजारभर प्रवास प्रवास करतात. रेल्वे येण्याच्या सुमारास स्थानकात गर्दी होते, गाडी जाताच ओसरते.
चौकट
सांगली व मिरज स्थानकांतील साध्या तिकिटांच्या खिडक्या वर्षभरापासून बंद आहेत. त्याशिवाय तिकीट व्हेंडिंग यंत्रेही बंद आहेत. पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू नसल्याने या खिडक्या सुरू झालेल्या नाहीत. फक्त आरक्षण कक्षात कामकाज सुरू आहे. प्लॅटफॉर्म तिकिटे मिळत नसल्याने अनावश्यक गर्दीवर आपोआप नियंत्रण मिळाले आहे.
चौकट
सध्या दररोज डझनभर रेल्वे
सध्या सांगली, मिरजेतून कोल्हापूर-मुंबई कोयना, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र, मिरज-बेंगलुरु राणी चेन्नम्मा, हुबळी-दादर, दिल्ली-यशवंतपूर संपर्कक्रांती, निजामुद्दीन गोवा, कोल्हापूर-नागपूर, यशवंतपूर-अजमेर, म्हैसूर-अजमेर, यशवंतपूर-जोधपूर, कोल्हापूर-तिरुपती, यशवंतपूर-गांधीधाम या मोजक्याच गाड्या धावताहेत. त्यापैकी राजस्थान, गुजरात, कर्नाटक, गोवा व दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यांना विशेष गर्दी असते.
कोट
पॅसेंजर गाड्या नसल्याने त्यांची तिकीट विक्रीही बंद आहे. पुण्या-मुंबईला जाण्यासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही. काही मोजक्या गाड्यावगळता अन्य गाड्या रिकाम्याच आहेत, तरीही कन्फर्म तिकिटाशिवाय गाडीत बसता येत नाही.
- चंदन शहा, प्रवासी
कोट
गोवा एक्स्प्रेससाठी रात्री बरीच गर्दी होते. पण त्यामध्ये फक्त आरक्षित तिकीटासह प्रवाशांना रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रवेश दिला. स्थानकात येतानाच विचारणा होत असल्याने अनावश्यक लोकांना प्रतिबंध झाला. दर वाढलेल्या प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री सांगली-मिरजेतही सुरू व्हायला हवी.
- सुरजित परमार, प्रवासी
कोट
पॅसेंजर गाड्या बंद असल्याने प्रवासी संख्या खूपच कमी झाली आहे. एक्स्प्रेस गाड्या येण्याच्या वेळेत आरक्षित तिकिटे घेतलेल्या प्रवाशांची गर्दी होते, उर्वरित वेळ स्थानक रिकामेच असते. प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद असून फक्त आरक्षण सुरू आहे. आरक्षण खिडक्यांवरही गर्दी नाही. बहुतांशी आरक्षण इंटरनेटवरून किंवा नेट कॅफेतून करण्याकडे प्रवासांचा कल आहे.
- व्ही. पन्नीरसेल्वम, स्थानक अधीक्षक, मिरज जंक्शन