सांगली-मिरजेत घरोघरी प्लास्टिक कचरा संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:51+5:302021-02-05T07:30:51+5:30
मिरजेतील निसर्ग संवाद व महापालिका क्षेत्र प्लास्टिक कचरामुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून ताे पुनर्वापरासाठी ...

सांगली-मिरजेत घरोघरी प्लास्टिक कचरा संकलन
मिरजेतील निसर्ग संवाद व महापालिका क्षेत्र प्लास्टिक कचरामुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून ताे पुनर्वापरासाठी पाठविण्यात येताे. विघटन न होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याने या समस्येवर उपाय म्हणून घराघरातून प्लास्टिक कचरा संकलनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात घरातील, परिसरातील सर्व प्लास्टिक एका पोत्यात एकत्र करून संस्थेची गाडी महिन्यातून एकदा घरी आल्यानंतर देण्यात येतो. हा एकत्रित केलेला कचरा पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात येतो.
मिरजेत सुरू झालेले प्लास्टिक कचरा संकलन आता सांगलीतही सुरू झाले आहे. वासंती लेले, हिमांशू लेले, संजय कट्टी, महेश कुलकर्णी, राजेंद्र जोशी, अर्चना लेले यांच्यासह अनेकांचा यामध्ये सहभाग आहे. काही ज्येष्ठ नागरिकांचे गटही या उपक्रमाच्या प्रचारात सहभागी आहेत. वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमात कोरोनामुळे काही काळ खंड पडला हाेता. गेल्या महिन्यापासून पुन्हा या उपक्रमास सुरुवात झाली आहे.
महापालिका किंवा अन्य कोणाच्या मदतीशिवाय कचरा संकलनासाठी येणारा खर्च संस्थेच्या सदस्यांकडून करण्यात येत असल्याचे या उपक्रमाचे मार्गदर्शक राजेंद्र जोशी यांनी सांगितले. सध्या दरमहा सुमारे अडीचशे किलो प्लास्टिक कचरा संकलन होत आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक चिदंबर कोटिभास्कर यांनीही या उपक्रमासाठी सहकार्याची तयारी दर्शविली आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढवून शहरातील काही प्रभाग प्लास्टिकमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निसर्ग संवादतर्फे सायकल चालवा अभियान, वसुंधरा महोत्सव, कापडी पिशव्या वाटप यासह विविध उपक्रम सुरू आहेत.
प्रत्येकाने प्लास्टिक संकलनाचा स्वतः संकल्प करून, आपल्या स्नेही नातलगांना प्लास्टिक कचऱ्यात न टाकण्याबद्दल सांगावे. भविष्यात हा संकल्प प्रत्येकाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असेही राजेंद्र जोशी यांनी सांगितले.
फाेटाे : ०१ मिरज १