चार पुलांमुळे सांगली सापडतेय महापुराच्या चक्रव्यूहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST2021-08-21T04:31:33+5:302021-08-21T04:31:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही ...

चार पुलांमुळे सांगली सापडतेय महापुराच्या चक्रव्यूहात
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीजवळ कृष्णेवरील चार पूल आणि रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव यामुळे शहर तिन्ही बाजूंनी महापुराच्या जबड्यात ढकलले जात आहे. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात असल्याची तज्ज्ञांची भूमिका आहे.
कृष्णेवर सध्या आयर्विन, बायपास हे दोन पूल अस्तित्वात आहेत. हरिपूर - कोथळी पूल पूर्णत्वाकडे आहे, तर सांगलीवाडी ते पांजरपोळ पुलाची चर्चा सुरु आहे. या पुलांच्या नियोजनात जलशास्त्रीय विचार केला जात नसल्याने सांगली महापुरात ढकलली जात आहे. हरिपूर - कोथळी पुलाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा प्रकर्षाने पटलावर आली आहे. यंदा ४५ फुटांच्या इशारा पातळीलाच पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे पावसाळ्यात उपयोग होणार नाही हे स्पष्ट आहे. दोन्ही बाजूच्या भरावामुळेही पाणी अडून राहणार आहे. भरावाऐवजी पिलर टाकून बॉक्स तयार करता येईल, त्यावरुन जोडरस्ते तयार करता येतील असाही प्रस्ताव आहे. हरिपूर ग्रामस्थांनी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला होता, पण दोन ते तीन कोटींचा खर्च वाढण्याने प्रस्ताव मागे पडला.
रत्नागिरी - नागपूर महामार्गाचा भराव देखील महापुराची तीव्रता वाढविणारा आहे. महामार्गासाठी सुमारे १५ फूट उंच भराव टाकला आहे. कोल्हापूर रस्त्यावर पसरणारे कृष्णेचे पाणी अंकलीकडून नदीत परतण्याचा मार्ग भरावामुळे अडवला गेला आहे. भरावाऐवजी अंकली फाट्यापासून मिरजेकडे सुमारे १० किलोमीटरपर्यंत उड्डाणपुलाची मागणी इनाम धामणी ग्रामस्थांनी केली आहे, पण रस्त्याचे काम पुढे गेले असल्याने हा पर्याय मागे पडला आहे.
या स्थितीत आता सांगलीवाडीतून शहराला जोडणाऱ्या पुलाची चर्चा सुरू आहे. तो प्रत्यक्षात आल्यास महापुराचे पाणी पुढे न जाता थेट सांगलीतच घुसण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चौकट
भरावाऐवजी बॉक्सचा पर्याय
पुलांच्या दोन्ही बाजूंच्या जोड रस्त्यांवर भराव टाकण्याऐवजी बॉक्सचा पर्याय तज्ज्ञांनी सुचविला आहे. सिमेंटच्या पिलरवर स्लॅब टाकून जोडरस्ते तयार करता येतील, जेणेकरुन त्याखालून पुराचे पाणी वाहून जाईल.
कोट
हरिपूर - कोथळी पुलाच्या दोन्ही बाजूंना भराव न टाकता बॉक्स बनविल्यास महापुराचे पाणी अडून राहणार नाही. पूल आणि बंधाऱ्यांमुळे नदीचा गळा आवळला जात आहे.
- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ
- पुलामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होतात, फुगवटा तयार होतो हे नाकारुन चालणार नाही. जोड रस्त्यांची उंची कमी ठेवल्याने महापुरात पूल निरुपयोगी ठरतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल उभारताना पाटबंधारेशी समन्वय राखला पाहिजे.
- विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता.