‘पश्चिमालाप’चा बहुमान सांगली जिल्ह्याला
By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:46:05+5:302015-02-21T00:16:06+5:30
मंगळवारी इस्लामपुरात कार्यक्रम : लोककला, सांस्कृतिक जीवनाचे सादरीकरण

‘पश्चिमालाप’चा बहुमान सांगली जिल्ह्याला
इस्लामपूर : विविध राज्यांच्या लोककलाजीवनाची व सांस्कृतिक वारशाची माहिती व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पश्चिम भारतासाठी तयार केलेल्या ‘पश्चिमालाप’ कार्यक्रमाचा बहुमान यंदा सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. यातील पहिला कार्यक्रम इस्लामपूर नगरपरिषदेच्या संयोजनाखाली २४ फेबु्रवारीला होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.
नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, अरुणादेवी पाटील, बी. ए. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार बैठक झाली. यावेळी देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व गोवा या चार राज्यांतील लोककला व सांस्कृतिक जीवनाची माहिती या कार्यक्रमातून मिळणार आहे. गतवर्षी हा कार्यक्रम राजस्थानमधील झुणझूण जिल्ह्यात झाला होता. प्रत्येकवर्षी या चार राज्यांतून एका जिल्ह्याची निवड केली जाते. तो बहुमान यावेळी सांगली जिल्ह्याला मिळाला आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या शिक्षण, सांस्कृतिक व क्रीडा समितीचे सभापती संजय कोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात आठ कार्यक्रम होतील.
देशमुख म्हणाले, राजस्थानमधील लोककला, तेहराताल, भवाई, कालबेलिया, गुजरातमधील टिप्पणी, गोव्यातील दिखणी व समईनृत्य, तर महाराष्ट्राची शान असणारी लावणी व भारुड अशा लोककलांचे सादरीकरण २४ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत राजारामबापू नाट्यगृहात होणार आहे. लोककलांचे जतन व संस्कृतीची देवाण—घेवाण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वरील चार राज्यांतील ६0 कलाकार हे कार्यक़्रम सादर करतील. शासनाच्या सांस्कृतिक कार्यालयाचे सहायक कार्यक्रम अधिकारी पंजक नागर, सभापती संजय कोरे व पुण्याच्या अमिता पेठकर संयोजन करीत आहेत. (वार्ताहर)
जिल्हाभर उपक्रम
सांगली जिल्ह्यातील ‘पश्चिमालाप’ कार्यक्रमाची सुरुवात दि. २४ फेबु्रवारीला इस्लामपुरातून झाल्यानंतर २५ रोजी सांगली, २६ रोजी मिरज, २७ रोजी तासगाव, २८ फेबु्रवारीला कडेगाव आणि पलूस, तर १ मार्चला खानापूर किंवा विटा, २ मार्च रोजी शिराळा, ३ मार्च रोजी जत, आटपाडी किंवा कवठेमहांकाळ पैकी एका ठिकाणी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम होईल.