सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची २०२१पर्यंत नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) ७५० कोटी थकबाकी होती. बँकेचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून तीन वर्षात १७५ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अजूनही ५७५ कोटी थकबाकी वसुलीचे जिल्हा बँकेसमोर मोठे आव्हान आहे. बड्या थकबाकीदारांवर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) नुसार कारवाई करण्यासाठी बँकेच्या प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.जिल्हा बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत ८ हजार १०० कोटी ठेवी जमा झाल्या आहेत. तसेच ७ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. ठेवीमध्ये ७०० कोटींची, तर कर्ज वाटपात ५५० कोटींची वाढ झाली आहे. जिल्हा बँकेच्या नफ्यातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण, जिल्हा बँकेकडील जुनी थकीत कर्ज डोकेदुखी ठरत आहेत.साखर कारखाने, सुतगिरण्यांसह अन्य काही संस्था आणि शेती कर्जदारांचा समावेश आहे. सर्वाधिक थकबाकी साखर कारखान्यांकडे आहे. वसंतदादा, केन ॲग्रो, महांकाली आणि माणगंगा साखर कारखान्यांकडेच ५५० कोटींची थकबाकी आहे. ही सर्व एनपीएची थकबाकी आहे. या कारखान्यांवर एनसीएलटीमध्ये जिल्हा बँकेतर्फे दावा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
शेतकऱ्यांनी व्याज सवलतीसाठी मुदतीत कर्ज भरा : नाईकराज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, शासन कर्जमाफी देणार नाही. यामुळे दोन लाख शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे २५ कोटींची थकबाकी त्वरित जिल्हा बँकेकडे भरून शून्य टक्के व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांना केले. दि. ३१ मार्च २०२५नंतर थकीत कर्जदाराला १२ टक्के व्याजासह दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. व्याज, दंडातून सुटका होण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
दत्त इंडियाने ८ वर्षात ४८ कोटीच भरलेदत्त इंडिया कंपनीला वसंतदादा साखर कारखाना ८४ कोटी ३७ लाख रुपये थकीत कर्ज जिल्हा बँकेत भरून भाड्याने चालवण्यासाठी दिला आहे. पण, दत्त इंडिया कंपनीने गेल्या आठ वर्षात केवळ ४८ कोटी रुपये भरले आहेत. दत्त इंडिया कंपनीकडे तीन वर्षाचा कालावधी शिल्लक असून, ३६ कोटी ३७ लाख रुपये वसुलीचे मोठे आव्हान जिल्हा बँकेसमोर आहे.