सांगलीत फसवा इराक इफेक्ट!

By Admin | Updated: June 24, 2014 01:20 IST2014-06-24T00:49:50+5:302014-06-24T01:20:48+5:30

पेट्रोलपंपांवर गर्दी : पंप बंद होण्याच्या अफवेने पळापळ

Sangli deceived Iraqi effect! | सांगलीत फसवा इराक इफेक्ट!

सांगलीत फसवा इराक इफेक्ट!

सांगली : इराकमध्ये युध्दाचा भडका उडाल्याने भारतातील पेट्रोलसाठा संपणार असून, पुढील चार ते पाच दिवस पेट्रोलपंप बंद राहणार असल्याचा संदेश व्हॉटस्-अ‍ॅपवरून काल (रविवारी) सायंकाळी सर्वत्र पसरला आणि एकच लगबग सुरू उडाली. जो तो सुसाट वेगाने पेट्रोलपंपांच्या दिशेने निघाला, परिणामी पेट्रोलपंपावर रांगाच रांगा दिसू लागल्या. पेट्रोलपंपचालकही अचानक रांगा लागल्याने बुचकळ्यात पडले; परंतु तो ‘फसवा इराक इफेक्ट’असल्याचे समोर आले. वाहनचालकांना सांगूनही कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आजही (सोमवारी) दुपारपर्यंत बऱ्याचशा पंपांवर पुन्हा रांगा लागल्या होत्या.
मागील काही दिवसांपासून तेलाच्या विहिरी असलेल्या इराकमध्ये युध्दजन्य परिस्थिती असल्याने पेट्रोलची टंचाई जाणवणार किंवा पेट्रोलच्या किमती वाढणार, याची चर्चा होती; परंतु त्याचा परिणाम प्रत्यक्षात जाणवत नव्हता. रविवारी सायंकाळी व्हॉटस्-अ‍ॅपवरून इराक इफेक्टमुळे पेट्रोलपंप पाच दिवस बंद राहणार असल्याचा संदेश सर्वत्र पसरला. नागरिकांनीही कोणतीही खातरजमा न करता ‘सामाजिक कर्तव्या’च्या भावनेतून तो अनेकांना शेअर केला आणि घोळ झाला. पेट्रोल संपणार, या दोन शब्दांनी हबकलेले अनेक वाहनचालक पेट्रोलपंपांकडे भरधाव वेगाने निघाले आणि काही वेळातच सर्वच पंप गर्दीने फुलून गेले. ज्यांना संदेश मिळाला नाही, त्यांना काहीच समजेना. कदाचित पेट्रोलच्या किमती वाढणार असतील, या हेतूने त्यांनीही पेट्रोलपंपांवरील गर्दीत उभे राहणे पसंत केले!
पेट्रोलपंप मालकांनी नक्की काय झाले, याची चौकशी करून वाहनधारकांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. परंतु कोणताच वाहनचालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. विशेष म्हणजे प्रत्येकाने नेहमीपेक्षा जादा पेट्रोल भरण्यास प्राधान्य दिले. रात्री अकरानंतरदेखील वाहनचालकांची गर्दी हटत नव्हती. अखेर पंप बंद झाल्याने नाईलाजाने अनेकांना घरी परतावे लागले. परंतु पुन्हा सकाळपासून रांगा लागल्याचे दिसत होते. काहींना ही अफवा असल्याचे समजल्याने रांगेत उभे राहण्याचे टाळले. दिवसभर शहरात चर्चा मात्र पेट्रोलपंपांवरील रांगांचीच होती. (वार्ताहर)

Web Title: Sangli deceived Iraqi effect!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.