सांगलीत सिलिंडरचा साठा जप्त
By Admin | Updated: August 15, 2014 00:21 IST2014-08-15T00:17:35+5:302014-08-15T00:21:45+5:30
एकास अटक : घरमालक फरार; इलेक्ट्रिक मोटारीद्वारे भरून विक्री

सांगलीत सिलिंडरचा साठा जप्त
सांगली : बेकायदा सिलिंडरचा साठा करून त्यामधील गॅस इलेक्ट्रिक मोटारीच्या मदतीने काढून तो अन्य सिलिंडरमध्ये भरून देणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज, गुरुवार सायंकाळी पर्दाफाश केला. टोळीचा मुख्य सूत्रधार शाहरुख मकसूद सनदी (वय २१, रा. खणभाग, म्हसोबा गल्ली, सांगली) याला अटक केली आहे. कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात ही कारवाई करण्यात आली. सिलिंडरचा साठा सापडलेल्या खोलीचा मालक शब्बीर अथणीकर हा असून, तो या कारवाईची चाहूल लागताच फरार झाला आहे. घरगुती, व्यावसायिक असे एकूण ५० सिलिंडर, चार इलेक्ट्रिक मोटारी, दोन रेग्युलेटर, वजनकाटा असा माल जप्त करण्यात आला आहे.
खतीब हा गेल्या दोन वर्षांपासून सिलिंडरमधील गॅस काढून तो ग्राहकांच्या रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून देण्याचा व्यवसाय करीत होता. यासाठी त्याने शिवशंभो चौकातील शब्बीर अथणीकर यांची खोली भाड्याने घेतली होती. अथणीकर यांचे दुमजली घर आहे. तळघरातील एका लहान खोलीत त्याचा व्यवसाय सुरू होता. या खोलीपर्यंत जाण्यासाठी अडगळीचा रस्ता आहे. यामुळे कुणालाही संशय येत नव्हता. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना या बेकायदेशीर व्यवसायाची माहिती मिळाली होती. त्यांनी गुन्हे अन्वेषणला कारवाईचे आदेश दिले होते. /प्त्यानुसार सायंकाळी सहा वाजता पोलिस पथकाने छापा टाकला. या छाप्यात घरगुती वापराचे ३९ सिलिंडर सापडले. यामध्ये सात सिलिंडर भरलेले आहेत. व्यावसायिक ११ सिलिंडर असून, एक भरलेला आहे. इलेक्ट्रीक मोटारीच्या मदतीने भरलेल्या सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून दिला जात होता. यासाठी चार इलेक्ट्रीक मोटारी होत्या. त्याही जप्त केल्या आहेत. या कारवाईची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा विभागातील अन्न-धान्य वितरण अधिकारी विलास डुबल यांचे पथक दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. खोलीचा मालक अथणीकर याचा शोध घेण्यात आला; मात्र तो फरारी झाला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अथणीकर यांना माहिती असूनही त्यांनी खतीबला सिलिंडरचा साठा करण्यासाठी खोली भाड्याने दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तो केवळ साठाच करीत नव्हता, तर सिलिंडरमधील गॅस काढून मोकळ्या सिलिंडरमध्ये भरून द्यायचा. या खोलीभोवती तीस ते पस्तीस लोक राहतात. एखादी दुर्घटनाही घडू शकली असती. तरीही तेथील लोकांनी पोलिसांत कधी तक्रार करण्याचे धाडस दाखविले नाही.
सिलिंडरचा काळाबाजार करणारी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. खतीबकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेले सिलिंडर आले कोठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जप्त करण्यात आलेले सिलिंडर विविध गॅस कंपन्यांचे आहेत. खतीबची कसून चौकशी सुरू आहे.
- विश्वनाथ घनवट, निरीक्षक