सांगलीत तरुणास दगडाने ठेचले
By Admin | Updated: April 14, 2015 00:56 IST2015-04-14T00:56:31+5:302015-04-14T00:56:31+5:30
गंभीर जखमी : चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

सांगलीत तरुणास दगडाने ठेचले
सांगली : बिअर शॉपीत बिअर पिताना झालेल्या वादातून एका तरुणाला डोके दगडाने ठेचून गंभीर जखमी करण्यात आले. अभिजित बापूसाहेब पाटील (वय ३०, रा. वृंदावन व्हिला, स्फूर्ती चौक, विश्रामबाग) असे जखमीचे नाव आहे. शंभरफुटी रस्त्यावरील फेडरल बँकेसमोर रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन संभाजी बनसोडे (रा. इनामधामणी, ता. मिरज), योगेश विलास भोरे (रा. हसनी आश्रम) व दोन अनोळखी (अद्याप नावे निष्पन्न नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. जखमी अभिजित पाटील याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने प्रकृतीचा धोका टळला आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब घेऊन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयितांच्या शोधासाठी सोमवारी दुपारी त्यांच्या घरावर छापे टाकले. मात्र घटनेनंतर ते फरारी झाल्याची माहिती मिळाली.
अभिजित पाटील व संशयित हे मित्र आहेत. ते शंभरफुटी रस्त्यावरील एका बिअर शॉपीत बिअर पिण्यासाठी गेले होते. तिथे त्यांचा बिल देण्यावरुन वाद झाला होता. हा वाद मिटलाही होता. त्यानंतर ते चालत फेडरल बँकेजवळ आले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद सुरु झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले.
संशयितांनी अभिजितला शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला खाली पाडून त्याचे डोके दगडाने ठेचण्यात आले. तो रक्तबंबाळ होताच संशयितांनी तेथून पलायन केले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. रस्त्यावरील लोकांची भीतीने पळापळ झाली. (प्रतिनिधी)