सांगली - काँग्रेस आघाडीत रंगली साठमारी
By Admin | Updated: August 27, 2014 23:18 IST2014-08-27T22:59:05+5:302014-08-27T23:18:43+5:30
विधानसभा निवडणूक : स्थानिक संघर्षाला धार

सांगली - काँग्रेस आघाडीत रंगली साठमारी
अविनाश कोळी --सांगली विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून सुरू झालेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा मुलाखतीतही घुमला. आघाडी झाली तर बंडखोरी अटळ असल्याचा इशाराच यानिमित्ताने देण्यात आला आहे. काँग्रेसने एकीकडे स्वबळाचा ठरावच केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने आठपैकी सात मतदारसंघांसाठीच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील आघाडीत राजकीय साठमारीचा हा खेळ रंगला असून, दोन्ही पक्षांकडे आठ मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या संख्येचे अर्धशतक झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी काँग्रेसची बैठक घेऊन, काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात म्हणून ठराव केला. प्रदेश कार्यकारिणीकडे तो पाठविण्यात आला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या बैठका व मेळाव्यांमधूनही बहुतांश नेत्यांनी स्वबळाची मागणी केली. आघाडीबाबतचे निर्णय पक्षश्रेष्ठींमार्फत घेतले जाणार असले तरी, स्वबळाच्या मागणीमागे बंडखोरीचा इशारा लपला आहे. आघाडी झालीच तर प्रत्येक मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला डिवचण्याचे प्रकार केले जाणार आहेत. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते व इच्छुकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांकडे आठ विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल ५३ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे ३४ आणि राष्ट्रवादीचे १९ इच्छुक आहेत. काँग्रेसने सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, खानापूर-आटपाडी आणि जत अशा पाच मतदारसंघांसाठी, तर राष्ट्रवादीने पलूस-कडेगाव वगळता अन्य सातही मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. दोन्ही पक्षांकडून एकमेकांना दिले जाणारे इशारे आता पडद्याआड असले तरी, प्रत्यक्ष विधानसभेच्या निवडणुकीतही आघाडी धर्माच्या नावाखाली बंडाचे झेंडे फडकविले जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माचा गाजावाजा करण्यात आला. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींनी धर्म पाळला, तर काहींनी नुसतेच मौन बाळगले होते. मात्र विधानसभेच्या रणांगणात आघाडीतील नेतेच एकमेकांच्या विरोधात असल्याने आघाडी धर्माची गोची झाली आहे. आघाडी धर्मामुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातूनच साठमारीचा खेळ रंगला आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, दिनकर पाटील यांनी, तर काँग्रेसवर नाराज असलेले शिवाजीराव नाईक अशा नेत्यांनी आघाडीला उघडपणे विरोध केला होता. अन्य नेत्यांकडून आघाडी धर्माच्या पालनाचा भास निर्माण करण्यात आला. बहुतांश ठिकाणी छुपी बंडखोरी होती. दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील तीव्र विरोध आता विधानसभेच्या निमित्ताने उफाळला आहे.
गळती आणि राष्ट्रवादीची खेळी
आघाडी धर्माच्या नावाखाली होत असलेली घुसमट असह्य झाल्याने राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. काही नेते आघाडी झाली तर पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. या सर्व गोष्टींवर तात्पुरता उपाय म्हणून राष्ट्रवादीने सात मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज दाखल करून घेतले. स्वबळाची मागणी जोर धरत असल्याने, किमान मुलाखतीतून तशी तयारी केली जात असल्याचा भास निर्माण केला जात आहे.