सांगली काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला!

By Admin | Updated: September 18, 2014 23:24 IST2014-09-18T23:01:55+5:302014-09-18T23:24:56+5:30

आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा : आघाडी धर्माचे वांदे

Sangli Congress-NCP struggle got over! | सांगली काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला!

सांगली काँग्रेस-राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला!

सांगली : काँग्रेस नेते मदन पाटील यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीपूर्वीच जुंपली आहे. आघाडी धर्माच्या नावाखाली एकत्रित बैठका घेऊन लोकसभेला जुळलेले दोन्ही पक्षांतील नेत्यांचे सूर, आता विधानसभेच्या निवडणुकीत बिघडले आहेत. दोन्ही पक्षांतील नेत्यांचा संघर्ष आता मतदारसंघाच्या दावेदारीपर्यंत पोहोचला आहे.
सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येक निवडणुकीत एकमेकांविरोधात लढत होते. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत आणि महापालिकेपासून जिल्हा बँकेपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत वर्चस्वासाठी या दोन्ही पक्षांचा संघर्ष सुरू आहे. गत लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष बाजूला ठेवून आघाडी धर्माचा गाजावाजा झाला. अनेक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी यापूर्वीच्या लढतींचे दाखले देत आघाडी धर्म पाळण्यास स्पष्टपणे नकार दिला.
स्थानिक पातळीवर नेते आणि कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक बनल्याने आघाडी धर्माच्या नावाखाली काहींनी एकेमकांविरोधातही काम केले. केवळ दिखाऊपणा म्हणून आघाडी धर्माचे वातावरण होते. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांच्या कार्यालयात प्रदीर्घ काळानंतर एकत्रित आले होते. लोकसभेला जुळलेले हे सूर अवघ्या पाच महिन्यात बिघडले आणि आता दोन्ही पक्षांचे नेते पुन्हा आमने-सामने आले आहेत.
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादीवर तोफ डागली. राष्ट्रवादीच्या दुटप्पी भूमिकेबद्दल त्यांनी परखड मते व्यक्त केली. त्यांच्या या टीकेने राष्ट्रवादी नेत्यांचाही पारा चढला. मदन पाटील यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक मानले जाणारे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील व कायमचे प्रतिस्पर्धी माजी आमदार दिनकर पाटील यांनी एकत्रितपणे मदन पाटील यांच्यावर प्रत्यारोप केले. उघडपणे आता त्यांच्यात वाक्युद्ध रंगले आहे. इतकेच नव्हे, तर आता त्यांच्या उमेदवारीलाही ते विरोध करीत आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघ १९५२ पासून काँग्रेसकडेच आहे. १९५२ पासून १९८५ पर्यंत ३३ वर्षे काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघावर होते. त्यानंतर आजअखेर काँग्रेसला केवळ १९९९ मध्येच यश मिळाले. हाच धागा पकडून राष्ट्रवादीने सांगली विधानसभा मतदारसंघावरच दावा केला आहे. हा दावा आता पक्षीय पातळीवर पोहोचला आहे.
ही जागा राष्ट्रवादीकडे घेऊन मदन पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यात त्यांना कितपत यश येईल, हे सांगता येत नसले तरी, भविष्यात दोन्ही पक्ष सांगली विधानसभा क्षेत्रात एकमेकांसमोर उभे राहण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसत आहेत. (प्रतिनिधी)

इच्छुकांचे बळ वाढले
राष्ट्रवादीतील इच्छुकांना मदन पाटील यांच्या विरोधी वक्तव्याने बळ मिळाले आहे. यापूर्वी केवळ आघाडीवर त्यांच्या उमेदवारीचे गणित अवलंबून होते. आता उघडपणे ते याठिकाणच्या उमेदवारीवर दावा करीत आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाने आघाडी धर्माच्या पालनाचे आदेश दिले तरी, ते सांगली विधानसभा क्षेत्रात पाळले जातील, याची शक्यता फार कमी आहे.

इच्छुकांचे बळ वाढले
राष्ट्रवादीतील इच्छुकांना मदन पाटील यांच्या विरोधी वक्तव्याने बळ मिळाले आहे. यापूर्वी केवळ आघाडीवर त्यांच्या उमेदवारीचे गणित अवलंबून होते. आता उघडपणे ते याठिकाणच्या उमेदवारीवर दावा करीत आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाने आघाडी धर्माच्या पालनाचे आदेश दिले तरी, ते सांगली विधानसभा क्षेत्रात पाळले जातील, याची शक्यता फार कमी आहे.

Web Title: Sangli Congress-NCP struggle got over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.