स्मार्ट सिटी योजनेसाठी पहिल्या २० शहरात सांगलीचा समावेश
By Admin | Updated: July 30, 2015 00:29 IST2015-07-29T23:42:08+5:302015-07-30T00:29:25+5:30
मुंबईत सादरीकरण : महापालिकेच्या आशा पल्लवित

स्मार्ट सिटी योजनेसाठी पहिल्या २० शहरात सांगलीचा समावेश
सांगली : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात राज्यातील २० शहरात सांगली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात यापैकी दहा शहरांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील समावेशाबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी आराखडा तयार केला आहे. बुधवारी मुंबईत मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह तांत्रिक समितीच्या आठ सदस्यांसमोर आयुक्त अजिज कारचे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ, प्रशासन अधिकारी नकुल जकाते उपस्थित होते.
स्पर्धेतील निकषानुसार महापालिकेने स्वत:ला स्वयंमूल्यांकनात ५७ गुण दिले होते. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत गुणानुक्रम पडताळणीत पालिकेला ८३ गुण मिळाले होते. आराखडा सादरीकरणावेळी आयुक्तांनी शहरातील विविध योजनांचा लेखाजोखा, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा, रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यात एलबीटीमुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली असतानाही सांगली महापालिकेने नागरी सुविधांबाबत घेतलेल्या दक्षतांची मांडणी केली. स्मार्ट सिटीअंतर्गत राज्यातील पहिल्या २० शहरांत सांगलीचा समावेश करण्यात आला. यातून आता दहा शहरांची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)