Sangli companies set up loot market | सांगलीत कंपन्यांनी मांडला लुटीचा बाजार
सांगलीत कंपन्यांनी मांडला लुटीचा बाजार

अविनाश कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कुणीही यावे, सांगलीकरांना लुटून जावे, अशी जिल्ह्याची स्थिती झाली आहे. गेल्या वीस वर्षांत पल्स, पॅन कार्ड क्लब, मैत्रेय, कडकनाथ यासह अनेक कंपन्यांनी सांगलीतील ठेवीदार, गुंतवणूकदारांना विविध आमिषांद्वारे हजारो कोटींचा गंडा घातला. आयुष्याची पुंजी परत मिळविण्यासाठी भाबडे गुंतवणूकदार आता केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत.
सहकार पंढरी म्हणून सांगली जिल्ह्याची ओळख आहे. सहकारी संस्थांबरोबरच सहकारी वित्तीय संस्थांचे जाळे सर्वदूर पसरले. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक झाली. विविध बॅँका व पतसंस्थांनी नियमबाह्य कारभार केल्यामुळे त्या अवसायनात गेल्या. अनेक संस्था अवसायनात गेल्या नसल्या तरी, त्या अडचणीत आल्या आहेत. हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये यात अडकले आहेत. सरकारी नोकरदार, कामगार, विक्रेते, किरकोळ व्यावसायिक, हमाल अशा ८९ हजार ५३३ सामान्य ठेवीदारांच्या ७६ कोटी ५९ लाख ३ हजार रुपयांच्या ठेवी जिल्ह्यातील पतसंस्थांत अडकल्या आहेत. सहकार विभागाकडून कारवाईबाबतची उदासीनता, कर्जवसुलीत संस्थांसमोर येणाऱ्या अडचणी आणि शासनस्तरावर बघ्याची भूमिका, अशा दुष्टचक्रात सामान्य ठेवीदार अडकले आहेत. बॅँकांमध्ये अडकलेल्या पैशांचा विचार केल्यास हा आकडा आणखी वाढतो.
वित्तीय संस्थांबरोबरच जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत अनेक कंपन्या, संस्थांनी येऊन येथील गुंतवणूकदारांना लुटले. जादा व्याजदर, मालमत्ता, परतावा, साखळी योजना अशा वेगवेगळ््या आमिषांच्या माध्यमातून जाहिरातबाजी झाली. पल्स, पॅन कार्ड क्लब, मैत्रेय, कडकनाथ या योजना-संस्थांनी लाखो गुंतवणूकदारांना जाळ््यात ओढले. आता ते पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवित आहेत. पोलीस, न्यायालये, शासनदरबारी गुतंवणूकदारांचा लढा सुरू आहे. अनेक छोट्या कंपन्या, संस्थांनीही गुंतवणूकदारांना लुटले. हा बाजार उजेडात आल्यानंतरही लोकांचे यास बळी पडणे सुरूच आहे.

फसवणूक का होत आहे
कंपन्यांकडून जादा व्याजदर, परताव्याचे आमिष
चांगल्या आर्थिक स्थितीचे मार्केटिंग
साखळी योजनांमधून सभासद श्रीमंत होत असल्याबाबतची खोटी माहिती
गुंतवणुकीच्या रकमेला संरक्षण असल्याबद्दलची दावेदारी
एजंटांना मोठ्या कमिशनचे आमिष
आलिशान कार्यालये, बैठकांतून कंपनीच्या कार्याचे आभासात्मक चित्र तयार करण्यात येते.


Web Title: Sangli companies set up loot market
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.