सांगली : आचारसंहिता भंगाचे ११ गुन्हे

By Admin | Updated: September 20, 2014 00:31 IST2014-09-19T23:31:43+5:302014-09-20T00:31:34+5:30

आरटीओंचा दणका : वाहने जप्त; कारवाईसाठी दोन पथके

Sangli: Code of Conduct violates 11 cases | सांगली : आचारसंहिता भंगाचे ११ गुन्हे

सांगली : आचारसंहिता भंगाचे ११ गुन्हे

सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग यांच्या पथकाने विनापरवाना वाहनांवर पोस्टर्स, बॅनर्स, राजकीय नेत्यांचे छायाचित्र व पक्षाचे चिन्ह लावून फिरणाऱ्या वाहनधारकांची धरपकड सुरु ठेवली आहे. गेल्या दोन दिवसात अशी ११ वाहने जप्त करुन वाहन मालकांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्या आठवड्यात आचारसंहिता लागू झाली. कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. मात्र उद्यापासून (शनिवार) अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गडसिंग यांनी आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेंतर्गत त्यांनी दोन पथके तैनात केली आहेत. या पथकात चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही दोन्ही पथके जिल्ह्यातील विविध भागात फिरत आहेत. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीही सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे.
पथकाने गेल्या दोन दिवसात सांगली, इस्लामपूर, मिरज व माधवनगर याठिकाणी अकरा वाहने ताब्यात घेतली. या वाहनांमध्ये पाच रिक्षा, तीन दुचाकी व तीन मोटारींचा समावेश आहे. या वाहनांवर विविध नेत्यांचे छायाचित्र, पक्षाचे चिन्ह, त्याखाली विविध मजकूर लिहिलेला आहे. या वाहनधारकांनी आचारसंहिता भंग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांची वाहने जप्त केली. या वाहन मालकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वाहनांच्या मालकांना ‘तुमच्यावर कारवाई का करु नये?’, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे गडसिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

कोणत्याही वाहनांवर पक्षाचे झेंडे, पोस्टर्स, बॅनर्स, ध्वनिक्षेपक हे परवानगीशिवाय लावू नये. उमेदवाराच्या प्रचारात असणाऱ्या वाहनधारकांनी संबंधित विभागाचा परवाना घ्यावा. असा परवाना घेतला आहे का नाही, याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तैनात केले जाणार आहे.
- हरिश्चंद्र गडसिंग,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

नोंदणी, परवाना निलंबित
जप्त केलेल्या पाचही वाहनांची नोंदणी व परवाना निलंबित करण्यात आला आहे. वाहनचालकांचे लायसन्स जप्त करुन तेही निलंबित केले आहे. निलंबनाची ही कारवाई सात दिवसांसाठी आहे. मात्र त्यानंतर वाहने ताब्यात देताना पुन्हा असा प्रकार घडल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी लेखी नोटीस दिली जाणार असल्याचे गडसिंग यांनी सांगितले.

Web Title: Sangli: Code of Conduct violates 11 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.