सांगली शहर पोलिसांची खरडपट्टी!
By Admin | Updated: March 29, 2015 00:42 IST2015-03-29T00:39:54+5:302015-03-29T00:42:46+5:30
पोलीसप्रमुख आक्रमक : अधिकारी फैलावर; कामाचा आढावा

सांगली शहर पोलिसांची खरडपट्टी!
सांगली : शहर पोलीस ठाण्यातील कामगिरीवर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेत गेल्या वर्षभरात गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेने काय कामगिरी केली, किती गुन्हे उघडकीस आणले, याचा आढावा घेतला. पोलिसांचा शहरात का धाक नाही? मुख्य बसस्थानक व आठवडा बाजारात चोऱ्या होऊनही त्या उघडकीस आणल्या जात नाहीत? शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचे गूढ का उकलले जात नाही? यासंदर्भातही विचारणा केली.
गुन्हे उघडकीस आणणारी शाखा म्हणून डीबी पथकाकडे पाहिले जाते. या पथकात दोन पोलीस अधिकाऱ्यासह पंधरा कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. पावसकरच्या खुनाचा छडा लावतो, असे छातीठोकपणे डीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. सहा महिने होऊन गेले तरी या अधिकाऱ्यासह तपासाचा एकही धागा हाती लागला नाही. यामुळे सावंत यांनी डीबीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मुख्य बसस्थानक, आठवडा बाजारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फाळकूटदादांची दहशत वाढत शहर पोलीस करतात तरी काय? असा सवाल सावंत यांनी केला. निरीक्षक मोरे यांच्याशी संपर्क साधूला रात्री उशिरा त्यांनी ‘डीबी’चे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. गेल्या वर्षभरात डीबी पथकाने काय कामगिरी केली, याची माहिती घेतली. मात्र काम समाधानकारक नसल्याने सावंत यांनी सर्वांची चांगलीच खरडपट्टी केली. पोलीसप्रमुखांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शहर पोलिसांची विशेषत: डीबी पथकाची पळताभूई थोडी झाली आहे.
‘डीबी’तडजोडीत माहीर!
‘डीबी’ पथकाने चोर पकडला तर, पुढे सरकत नाही. चोरट्यास ताब्यात घेतल्याची कोठेही नोंद केली जात नाही. चोरीतील माल जप्त केला जातो; पण तो रेकॉर्डवर घेतला जात नसल्याची चर्चा होती. यासंदर्भात सावंत यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. घरफोडीतील एका सराईत गुन्हेगारास तब्बल दहा दिवसांनी अटक दाखविली. आठवड्यापूर्वी एका जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा टाकला. छाप्याची चाहूल लागल्याने एकाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्याचा पाय मोडला. या कारवाईचीही नोंद केली नाही. आठवडा बाजारात चोरी करताना महिलेस पकडले. तिच्याकडून माहिती घेऊन सराफासह दोघांना उचलून आणले. मोठ्या प्रमाणात दागिने व रोकड जप्त केली. परंतु याचीही कुठे नोंद केली नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)