सांगलीत व्यापाऱ्यांचा पुन्हा ‘एलबीटी’वर बहिष्कार
By Admin | Updated: March 1, 2015 00:17 IST2015-03-01T00:16:57+5:302015-03-01T00:17:18+5:30
कारवाईविरोधात आंदोलन : धमकी सत्राबद्दल मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, बेमुदत व्यापार ‘बंद’चा इशारा

सांगलीत व्यापाऱ्यांचा पुन्हा ‘एलबीटी’वर बहिष्कार
सांगली : ‘एलबीटी’प्रश्नी महापालिकेने सुरू केलेली कारवाईची तयारी आणि धमकीसत्राला उत्तर म्हणून व्यापाऱ्यांनी एलबीटीवर पुन्हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत घेतला. येत्या २ मार्चला मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत व्यापाऱ्यांची बैठक होत असून, यावेळी महापालिकेच्या भूमिकेविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती एलबीटीविरोधी कृती समितीचे प्रमुख समीर शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने २ मार्चपासून वसुलीसाठी कारवाईचा इशारा दिला आहे. छापा व तपासणीचे आदेशही महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. दंड आणि व्याज माफ करण्याबाबत व्यापारी आग्रही असताना महापालिका पदाधिकाऱ्यांनी सवलत देण्यास विरोध दर्शविला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी एलबीटीविरोधी कृती समितीने शनिवारी रात्री सांगलीच्या टिळक स्मारक मंदिरात बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेच्या दंडेलशाहीचा निषेध करण्यात आला.
बैठकीतील निर्णयांविषयी माहिती देताना समीर शहा म्हणाले की, मुंबईतील बैठकीनंतर आम्ही एलबीटीची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. व्यापाऱ्यांनी शांततेची भूमिका घेतल्यानंतर महापालिकेने त्याचा गैरफायदा घेत धमकीसत्र चालू केले. त्यामुळे कर भरण्याच्या मानसिकतेत असलेल्या व्यापाऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जे व्यापारी कर भरत होते आणि ज्यांनी कर भरण्याची तयारी दर्शविली होती, अशा सर्व व्यापाऱ्यांनी आता एलबीटीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने जर सोमवारपासून छापासत्र किंवा तपासणीची कारवाई सुरू केली, तर महापालिका क्षेत्रातील व्यापार बेमुदत बंद ठेवू.
मुंबईत येत्या ३ मार्चला दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांची बैठक होत आहे. फडणवीस यांनीच व्यापाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या धमकीसत्राबद्दल आम्ही तक्रार दाखल करणार आहोत. महापालिकेने जर अशीच भूमिका ठेवली तर एलबीटी जमा होणार नाही. शासन जोपर्यंत एलबीटीबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमचेही आंदोलन सुरूच राहील, असे ते म्हणाले.
या बैठकीस विराज कोकणे, अनंत चिमड, आप्पा कोरे, सुरेश पटेल, धीरेन शहा, सोनेश बाफना, मुकेश चावला, प्रसाद कागवाडे, सुदर्शन माने, गौरव शेडजी, अशोक शहा उपस्थित होते.
आता शासनच निर्णय घेईल
शहा म्हणाले की, एलबीटीबाबत व्यापाऱ्यांनी आता ठाम भूमिका घेतली आहे. प्रसंगी व्यापार बंद ठेवण्याची वेळ आली तर, आम्ही ठेवू, पण महापालिकेच्या कारवाईला विरोध करू. एलबीटीप्रश्नी निर्माण होणाऱ्या या संघर्षाला महापालिकाच जबाबदार आहे. त्यामुळे याबाबत आता शासनच निर्णय घेईल. (प्रतिनिधी)