सांगली : अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला
By Admin | Updated: January 6, 2017 15:33 IST2017-01-06T15:33:27+5:302017-01-06T15:33:27+5:30
सांगलीजवळील भिलवडी येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला आहे.

सांगली : अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला
>ऑनलाइन लोकमत
भिलवडी (ता. पलूस), दि. ६ - येथे चोपडे मळ्याजवळ अनुजा आनंदराव शिंदे (वय १૪) या शाळकरी मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडला आहे. मृत्यूच्या कारणाबाबत विविध शक्यता वर्तविल्या जात असून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
आज शुक्रवार दि. ६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास हा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. संबंधितांनी भिलवडी पोलिसांत याबाबत माहिती कळवली. भिलवडी पोलिसअधीक्षक ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत पोलिस व नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी, ही मुलगी माळवाडी येथील चव्हाण प्लॉटमध्ये राहत होती. ती सेकंडरी स्कूल भिलवडीमध्ये आठवीत शिकत होती. चार वर्षापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर आई व बहिणीसह राहत होती. तिची आई सूतगिरणीमध्ये नोकरीस आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुलींचा सांभाळ करीत आहे. गुरुवारी रात्री अनुजा व तिची आई या दोघींची जोरदार भांडणे झाली. त्यानंतर रात्री साडेआठच्या दरम्यान ती रडत रडत घराबाहेर पडली असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली. दरम्यान आज सकाळी भिलवडी तासगाव रस्त्यावर असणाऱ्या चोपडे मळ्यालगत तिचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासांती हृदयविकाराचा धक्का किंवा बलात्कार करून खून यापैकी एका कारणामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहेत. दुपारी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.